अधिकाऱ्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे घोडा बांधायची मागितली परवानगी
नांदेड: सर्वसामान्यपणे आपण घोड्यावर एकदाच बसत असतो, तेही लग्नात. अन् रोजच घोड्यावर कार्यालयात येणार म्हटल्यास आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. असंच काहीसं नांदेडमध्ये घडलंय. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने मी कार्यालयात येण्यासाठी घोडा घेणार आहे, अन् त्याच घोड्यावर कार्यालयात येणार असल्याचं ठरवलं आहे. मात्र, घोडा लावायचा (बांधायचा) कुठं असा प्रश्न निर्माण झाल्याने या अधिकाऱ्याने चक्क जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोडा बांधायची परवानगी देण्याची मागणी केली आहे.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी (रोहयो) विभागात कार्यरत सतीश पंजाबराव देशमुख यांनी, आपल्याला पाठीच्या मणक्याचा त्रास होत असल्याने मोटारसायकलवर कार्यालयात येणे शक्य होणार नाही. कार्यालयात येण्यासाठी घोडा घेणार आहे. मी घोड्यावर बसून कार्यालयात वेळेवर पोचणार आहे. मात्र, हा घोडा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधण्यास परवानगी देण्यात यावी, असे साकडे जिल्हाधिकाऱ्यांना घातले आहे. आता जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे वरचेवर पेट्रोलचे दर वाढत आहेत. त्यामुळे कार्यालयात घोड्यावर येण्यासाठी घोडा घेणे समजू शकतो. मात्र, पाठीच्या मणक्याचा त्रास होतो म्हणून कार्यालयात घोड्यावर येणे म्हणजे आश्चर्यकारकच म्हणायला हवे.
माफी मागून परवानगीचा अर्ज घेतला मागे: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोडा बांधायच्या परवानगीचे पत्र सोशल मीडिया वर व्हायरल झाल्याने याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची तातडीने दखल घेतली. आता हे प्रकरण अंगलट येणार, हे लक्षात येताच या अधिकारी महोदयाने प्रशासनाची माफी मागून घोडा बांधायच्या परवानगीचा अर्ज मागे घेतला. एकंदरीत या प्रकरणाने जोरदार चर्चा झाली असली तरी प्रशासनाने ही घोड्याच्या वेगाने याची दखल घेतल्याने या प्रकरणावर एकदाचा पडदा पडला.