# ‘पेट‘संदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.

पेट दुसरा पेपर ऑनलाईन पध्दतीनेच घरुन देण्याऐवजी परीक्षा केंद्रावरुन घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणा-या ‘पेट‘चा दुसरा पेपर विद्यार्थ्यांना घरुन देण्यास मान्यता द्यावी, या संदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली. या संदर्भात न्यायमूर्ती संजय व्ही.गंगापूरवाला व न्या.श्रीकांत डी.कुलकर्णी यांनी गुरुवारी (दि.१८) निकाल दिला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी प्रवेश पूर्व परीक्षा (पेट) प्रक्रिया सध्या राबविण्यात येत आहे. ‘पेट’चा पहिला पेपर ३० जानेवारी रोजी घेण्यात आला. सदर पेपर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला. तथापि या पेपरला विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचा काही तक्रारी विद्यापीठास प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभुमीवर पेट दुसरा पेपर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीनेच तथापि घरुन देण्याऐवजी परीक्षा केंद्रावरुन घेण्याचा निर्णय मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे. सदर निर्णयास मोहम्मद यासीन व अतुल राजेंद्र कांबळे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (याचिका क्रमांक -६२१४/२०२१ ) याचिकाद्वारे बुधवारी (दि.१७)  आव्हान दिले होते. विद्यार्थ्यांना ‘पेट‘चा दुसरा पेपर सेंटर ऐवजी घरुन घेण्यास विद्यापीठास आदेशित करावे, असे याचिकेत म्हटले होते. तथापि शासन निर्णयाप्रमाणे ‘कोविंड संदर्भात सर्वोतोपरी उपायोजना करुन सदर परीक्षा घेण्यात येईल, असे विद्यापीठाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. अखेरीस मा.उच्च न्यायालयाने या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिका निकाली काढली. विद्यापीठाच्यावतीने अ‍ॅड.सिध्देश्वर ठोंबरे यांनी काम पाहिले तर विधि अधिकारी किशोर नाडे यांनी सहकार्य केले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड.तब्रेजुद्दिन कादरी यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *