पुणे: गेल्या 1 एप्रिल 2020 पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 14 लाख 29 हजार 811 ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यात करण्याचे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी दिले आहेत.
महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरित भरणा करावा व सहकार्य करावे. आवश्यकता असल्यास हप्त्यांची देखील सोय केलेली आहे, असे आवाहन त्यांनी केले. सोबतच थकबाकीचा भरणा न करणाऱ्या इतर थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा देखील नियमानुसार खंडित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीजबिलांच्या थकबाकीसह इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी नुकत्याच झालेल्या व्हीडीओ कॉन्फरंन्सिग बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्यासह पाचही जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. नाळे म्हणाले की, सद्यस्थितीत पुणे (1032.80 कोटी), सातारा (140.36 कोटी), सोलापूर (259.12 कोटी), सांगली (192.54 कोटी) व कोल्हापूर (337.43 कोटी) जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे एकूण 1962 कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी 1247 कोटी 49 लाख रुपयांची थकबाकी असणाऱ्या 14 लाख 29 हजार 811 वीजग्राहकांनी गेल्या 1 एप्रिल 2020 पासून एकाही महिन्याचे वीजबिल भरलेले नाही. महावितरणकडून वारंवार प्रत्यक्ष संपर्क साधून देखील ग्राहकांनी थकबाकीचा भरणा केलेला नाही. त्यामुळे नाईलाजाने पुढील तीन आठवड्यांत या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल. परंतु त्याआधीच थकबाकीचा भरणा करून ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. नाळे यांनी केले.
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 10 महिन्यांमध्ये एकदाही वीजबिल न भरणाऱ्या घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक 12 लाख 68 हजार 487 असून त्यांच्याकडे 856 कोटी 81 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर 1 लाख 38 हजार 870 वाणिज्यिक ग्राहकांकडे 264 कोटी 32 लाख आणि 22 हजार 454 औद्योगिक ग्राहकांकडे 126 कोटी 35 लाखांची थकबाकी आहे. वीजबिलांबाबत शंका, तक्रारींचे निरसन तसेच विनंती करून देखील प्रतिसाद नसल्याने या वीजग्राहकांचा वीजपुरवठा या महिन्यातच खंडित करण्याची कटू कारवाई सुरु करण्यात येत असल्याचे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. नाळे यांनी स्पष्ट केले. या कारवाईसाठी पथके तयार करून आवश्यक संख्येत कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी इतर कार्यालयांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांचा या पथकांमध्ये समावेश करावा, अशी सूचना त्यांनी केली.
पश्चिम महाराष्ट्रात ज्या ठिकाणी पायाभूत वीज वितरण यंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा ठिकाणच्या व कोटेशन भरलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक नवीन वीजजोडण्या येत्या आठवड्याभरात कार्यान्वित कराव्यात. तसेच कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 मधील विविध योजनांची माहिती कृषी ग्राहक, सहकारी संस्था, बचत गट, गावपातळीवरील संस्था, ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटीद्वारे देण्याची सूचना प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केली. या बैठकीमध्ये महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अलोक गांगुर्डे, उपमहाव्यवस्थापक (आयटी) एकनाथ चव्हाण, अधीक्षक अभियंता शंकर तायडे (संचालन) आदींसह अभियंता व अधिकारी उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रातील वीजबिल भरणा केंद्र सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरु राहणार:
पुणे: वीजग्राहकांना सार्वजनिक सुटीच्या दिवशी थकबाकी व वीजबिलांचा भरणा करता यावा यासाठी महावितरणचे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र फेब्रुवारी महिन्यातील सर्व सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत. या संदर्भात प्रादेशिक कार्यालयातून सर्व कार्यालयांना निर्देश देण्यात आले आहे.
महावितरणवरील आर्थिक संकट अतिशय गंभीर असल्याने थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणकडून आवाहन करण्यात येत आहे. सोबतच नोटीस पाठवून व प्रत्यक्ष संपर्क साधून वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील वीजग्राहकांच्या सोयीसाठी फेब्रुवारी महिन्यातील सर्व शनिवार व रविवारसह इतर सार्वजनिक सुटीच्या दिवशी देखील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.
याशिवाय घरबसल्या थकबाकी व वीजबिलांचा भरणा करण्यासाठी ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वीजग्राहकांना ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅपची सेवा उपलब्ध आहे. चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे.
महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’चे क्रेडीट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्याय निःशुल्क झाले आहेत. नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी याआधी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु फक्त क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीटकार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क आहे. ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करण्यासाठी घरबसल्या ‘ऑनलाईन’ सेवा तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी देखील सुरु असलेले वीजबिल भरणा केंद्र उपलब्ध आहेत. वीजग्राहकांनी थकबाकीसह वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.