काठमांडू: खरी अयोध्या भारतात नव्हे, तर नेपाळमध्ये आहे. प्रभू श्रीरामही नेपाळी होते, असा अजब दावा नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी केला आहे. तसेच भारताने सांस्कृतिक अतिक्रमण करत बनावट अयोध्या निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, भारतातील अयोध्येत वाद आहेत. मात्र, आमच्याकडे तसा वाद नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.
नेपाळी कवी भानुभक्त आचार्य यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. शर्मा ओली म्हणाले, खरी अयोध्या नेपाळमधील बीरगंज गावाजवळ आहे, तिथेच रामाचा जन्म झाला आहे. नेपाळवर सांस्कृतिकदृष्ट्या अत्याचार होत आहेत. ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड केली जात आहे. आमचा अजूनही विश्वास आहे की, आम्ही भारतीय राजपुत्र रामाला सीता दिली.
भारताने सांस्कृतिक अतिक्रमण करत बनावट अयोध्यानगरी निर्माण केली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. शर्मा यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. नेपाळमधील राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे नेते कमल थापा यांनी शर्मा यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने अशा पद्धतीने आधारहीन गोष्टींवर वक्तव्य करणे उचित नाही, असे थापा यांनी म्हटले आहे.