पुणे: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वच जिल्ह्यात मुसळधर पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक भागात ढगफुटी आणि विजांचा प्रचंड कडकडाट व जोरदार वारे यामुळे विविध भागात मोठे नुकसान होत आहे. धुमाकूळ घालणारा हा पाऊस 18 ऑक्टोबर पर्यंत कायम राहणार असून, त्यानंतरच परतीचा मान्सून सुरू होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
तेलंगण राज्यावर असलेले तीव्र कमी दाबाचा पट्टा उत्तर कर्नाटकपासून महाराष्ट्रापर्यंत आहे. हा पट्टा गुलबर्गापासून 80 तर पूर्व सोलापूरपासून 160 किमी अंतरावर जमीनीवर असून, पुढील 12 तासात या पट्ट्याची तीव्रता कमी होऊन तो मध्यपूर्व अरबी समुद्र मध्यमहाराष्ट्राची किनारपट्टीकडे 16 ऑक्टोबर पर्यंत सरकणार आहे. त्यानंतर मध्यपूर्व अरबी समुद्र, उत्तर पूर्व अरबीसमुद्र महाराष्ट्राची किनारपट्टी पार करून दक्षिण गुजरातकडे जाणार आहे. असे असले तरी राज्यात तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 18 ऑक्टोबर पर्यंत पाऊस कायम राहणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात 15 व 16 ऑक्टोबर पर्यंत ‘रेड अलर्ट’, रायगड, कोल्हापूर, सातारा, ठाणे, मुंबई, या भागात 15 ते 17 ऑक्टोबर पर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये 15 ते 18 ऑक्टोबर पर्यंत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.