पुणे: मान्सूनचा पश्चिम राजस्थानमधून सुरू केलेला परतीचा प्रवास आता वेगाने पुढे जात आहे. मंगळवारी मान्सूनने उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. लवकरच महाराष्ट्रातूनही मान्सून परतीचा प्रवास सुरू करणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सुरू असलेला पाऊस आता पूर्णपणे थांबण्याची शक्यत आहे. असे सूतोवाच देखील हवामान विभागाने केले आहे.
राज्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस अजून सुरूच आहे. मात्र, त्याचा प्रभाव कमी झालेला आहे. दरम्यान, 28 सप्टेंबरपासून मान्सूनचा पश्चिम राजस्थानपासून परतीचा प्रवास सुरू झाला. मंगळवारी उत्तर अरबी समुद्र आणि दक्षिण गुजरातपर्यंत आलेला आहे. महाराष्ट्रातून 15 ऑक्टोबरपासून मान्सून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. राज्यातील पाऊस लवकरच थांबणार आहे. सध्या ओडिशा किनारपट्टीवर चक्रीय स्थिती असून, दक्षिण गुजरात पार करून विदर्भ व उत्तर महाराष्ट्रापर्यंत द्रोणीय आणि चक्रीय स्थिती आहे. तसेच 9 ऑक्टोबरला बंगालच्या उपसागरातील मध्यपूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्यानंतर लागलीच त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे.