पुणे: मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. त्यानुसार येत्या तीन दिवसात (दि.28) मान्सूनचा पश्चिम राजस्थानपासून परतीचा प्रवास सुरू होणार आहे. ही माहिती भारतीय हवामानाशास्त्र विभागाने दिली.
देशात जून आणि जुलै या दोन महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. मात्र, ऑगस्टपासून राज्यासह देशात जोरदार हजेरी लावली. अगदी सप्टेंबर महिना संपत आला तरी पावसाचा जोर अजूनही कमी झालेला नाही. असे असले तरी मान्सूनचा लांबलेला प्रवास आता मात्र सुरू होणार आहे. 28 सप्टेंबरपासून मान्सूनचा प्रवास सुरू होणार असून, महाराष्ट्रामधून 5 ऑक्टोबरपासून मान्सूनचा प्रवास सुरू होणार आहे, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली.
दरम्यान, राज्यातील पाऊस आता कमी होऊ लागला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी मुंबईसह राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाने हजरी लावली होती. आता मात्र हा पाऊस देखील कमी झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात केवळ विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडेल. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.