पुणे: परतीचा पाऊस २८ सप्टेंबर पासून सुरु होणार असल्याचे बुधवारी हवामान शास्त्र विभागाने जाहीर केले. तो महाराष्ट्रातून ५ ते ७ ऑक्टोबरच्या दरम्यान निघेल. दरम्यान, हिमालय पायथा ते उत्तर प्रदेश, बिहार या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने २४ ते २६ ला पूर परिस्थिती निर्माण होईल असाही अंदाज व्यक्त केला आहे.
हवामानशास्त्र विभागाने एका विशेष बुलेटीनव्दारे ही माहिती दिली. यात म्हटले आहे की, २८ सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थानातून परतीचा पाऊस सुरु होइल तशी स्थिती आता निर्माण झाल्याचे दिसत असून तो राजस्थानातून उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, गुजरात असा प्रवास करीत महाराष्ट्रातून ५ ते ७ ऑक्टोबर पर्यंत जाईल. सध्या उत्तर प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरात प्रचंड आद्रतायुक्त वातावरण आहे. त्यामुळे हिमालयाचा पायथा, उत्तर प्रदेश ते बिहार या भागात २४ ते २६ सप्टेंबर या काळात पूर स्थिती निर्माण होईल तसचे कोकण, गोवा गुजरात या भागात २४ ते २६ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस हाईल.
राज्यातील पाऊस कमी होणार:
२४ ते २६ सप्टेंबर या कालवधीत मुंबईसह कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा या भागातील पाऊस कमी होत आहे. या दोन दिवसात पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद येथे मध्यम ते तुरळक पाऊस होईल. २८ नंतर राजस्थानातून पाऊस खाली यायला सुरुवात होईल महाराष्ट्रातून त्याचा परतीचा टप्पा ५ ते ७ ऑक्टोबर पासून सुरु होण्याची शक्यता आहे.