देशावर हिंदुत्ववाद्यांचे नव्हे, तर माफियांचे राज्य :डॉ.कुमार सप्तर्षी

‘हू किल्ड जज लोया?’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे: ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले लिखित ‘हू किल्ड जज लोया ?’ या पुस्तकाचे प्रकाशन  सोमवार, ९ मे रोजी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी, राज्याचे माजी  विशेष पोलिस महासंचालक एस.एम. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल आयोजित हा प्रकाशन समारंभ गांधी भवन (कोथरूड) येथे झाला. एस.एम. मुश्रीफ, गांधी स्मारक निधीचे विश्वस्त डॉ. मच्छिंद्र गोरडे, युक्रांदचे संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, अप्पा अनारसे मंचावर उपस्थित होते.

निरंजन टकले म्हणाले, ‘फॅसिस्ट प्रवृत्तींना आपण घाबरत नाही, हे दाखवावं लागतं. प्रत्येक क्षणी अडथळे येणार हे लक्षात ठेवावे लागते. मगच शोधपत्रिका करता येते. न्या.ब्रिजगोपाल लोया यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणावर बातमी करण्यासाठी माहिती मिळविताना खूप धमक्या आल्या, भीती दाखवली गेली. न्या.लोया संशयास्पद मृत्यू प्रकरणातील अनेक माहिती लपवली गेली. लोया यांच्यावर एका खटल्या संदर्भात दबाव असल्याची कल्पना त्यांच्या भगिनीला दिली होती.

जर ह्रदयविकाराने लोयांना मृत्यू आला होता तर कपडे रक्ताने का माखले होते? लोयाना आर्थोपेडिक हॉस्पिटलला का नेण्यात आले? मृत्युची जी वेळ दाखवली गेली, त्याआधीच नातेवाईकांना मृत्युची बातमी का कळवली? मृतदेह लातूरला का नेला गेला? जे  न्यायाधीश लोयांच्या सोबत मुंबई ते नागपूर प्रवासात होते, ते मृत्युनंतर लोयांच्या नातेवाईकांना लगेच सांत्वनासाठी का भेटले नाहीत? अशा अनेक गूढ प्रश्न न्या.लोया यांच्या संशयास्पद मृत्यू मागे आहेत.

हे पुस्तक प्रकाशित करताना अनेक प्रकाशकांनी नकार दिला. आयएसबीएन नंबरसाठी अडचणी आल्या. तरीही हे पुस्तक प्रकाशित झाले. पुढे मराठी, गुजराती, पंजाबी, कन्नड मध्ये अनुवाद येणार आहे. २०१४ नंतरच्या काळात पत्रकारांनी सत्य सांगून सैतानी वृत्तीला लाजवलं पाहिजे. आता केवळ लिहून चालणार नाही, तर बोलत राहिले पाहिजे.

व्यवस्था सत्य दाबते -एस.एम. मुश्रीफ: एस.एम. मुश्रीफ म्हणाले, ‘हे पुस्तक व्यवस्थेच्या विरोधात आहे. अशा गोष्टी दाबायच्या प्रयत्न होतो. कारण व्यवस्थेला सत्य बाहेर आणायचे नसते.२००६ च्या  मालेगाव बॉम्बस्फोटात देखील खऱ्या आरोपींना लपवून खोट्या आरोपींना अडकविण्यात आले. ‘हू किल्ड करकरे? ‘या पुस्तकात मी सत्य मांडायचा प्रयत्न केला आहे. करकरे यांना मारण्याबाबत आय.बी, संघ परिवार, अभिनव भारत वर मी आरोप करूनही माझ्यावर कोणी खटला दाखल करू शकले नाही. आपण नेहमी सत्यासोबत राहायला हवे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘आताची आणीबाणी फार वेगळी आहे. या आणीबाणीत माफियागिरी आहे. हिंदुत्ववादी सत्याच्या बाजूने असू शकत नाहीत, हे या पुस्तकातून लक्षात होते. या देशात माणसं मारण्याचा पध्दतशीर उद्योग चालू आहे. सत्य बोलणाऱ्यालाच जीवाला जपावं लागत असेल, तर समाजात मोठा बिघाड झाला आहे.

लोया यांच्या संशयास्पद मृत्युच्या काळात अमित शहा नागपूरच्या रवी भवनला असणं, मुख्य न्यायाधीश असणं, यातून सर्व गोष्टींचा उलगडा होतो. मध्यमवर्गाने प्रचारकी गोष्टींना विरोध केला नाही तर आपला लोचा तरी होईल किंवा लोया तरी होईल. आपल्यावर हिंदुत्ववादी राज्य करीत नसून माफिया राज्य करीत आहेत. या काळात  आपण वेडे होण्याच्या कडेलोटावर उभे आहोत. त्यातून सत्याकडे जाण्याची इच्छा निरंजन टकले यांच्या पुस्तकाचे वाचन केल्यावर निर्माण होते.

संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, अप्पा अनारसे, विजय बोडेकर, सचिन पांडुळे, नीलम पंडित, कमलाकर शेटे, सुदर्शन चखाले, अजय नेमाणे, रोहन गायकवाड, रेश्मा सांबरे, प्रसाद झावरे यांनी संयोजन केले. यावेळी अन्वर राजन, डॉ. प्रवीण सप्तर्षी, सुनीती सु.र., गोपाळ तिवारी, प्रशांत कोठडिया, विकास लवांडे, प्रसाद झावरे, श्रीरंजन आवटे उपस्थित होते. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. अप्पा अनारसे यांनी आभार मानले.

पाठपुरावा करून निर्भीड लेखन: न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या गूढ मृत्यूबद्दल पत्रकार निरंजन टकले यांनी २०१७ सालच्या नोव्हेंबर महिन्यात लिहिलेल्या लेखमालिकेने देशात खळबळ उडवून दिली. निरंजन टकले यांचे आयुष्य त्यामूळे पूर्ण बदलून गेले. अनेक आव्हाने समोर आली. प्राण पणाला लावून ते लिहीत राहीले, बोलत राहीले. त्यांनी अखंड संचार केला. अनेक दिवस पाठपुरावा करून, पुरावे गोळा करून लिहिलेल्या या प्रकरणाचे सर्व तपशील आता पुस्तकाच्या रूपाने भेटीस आला आहे. या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने हा प्रेरणादायी संघर्ष उपस्थितांना  समजावून घेता आला.

One thought on “देशावर हिंदुत्ववाद्यांचे नव्हे, तर माफियांचे राज्य :डॉ.कुमार सप्तर्षी

  1. कुमार सप्तर्षी अगदी खरं बोलले . हिदुत्व वादी (?) मविआ सरकारने तसंच केलं आहे .
    इंदिराजींनी जेव्हा आणिबाणी जाहिर केली तेव्हा त्यांच्या विरुद्ध बोलणारा लगेच जेल मध्ये जायचा .जसं आता राणा दांपत्य जेलमध्ये गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *