# अंबाजोगाईतील ‘त्या’ कोरोनाग्रस्त मृतदेहांची फरफट थांबली; रात्री उशिरा अंत्यसंस्कार.

तब्बल ३५ तासानंतर दासोपंत समाधी परिसरात शुक्रवारी पहाटे अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण

अंबाजोगाई: कोरोनाच्या संसर्गरोगावर येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिकांचा विरोध व स्मशानभूमीच्या वादावरून पार्थिवावरील रखडलेले अंत्यसंस्कार अखेर नगर परिषदेच्या सर्वे नंबर १७ मधील मुकुंदराज रोडवर दासोपंत समाधी परिसरातील जागेत रात्री १ वाजता करण्यात आल्याने एकदाची त्या मृतदेहांची फरफट व नातेवाईकांची परवड थांबली.

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या दोन रुग्णांचा २२ जुलैच्या रात्री आणि २३ जुलैच्या पहाटे एक एक असे दोन कोविड रुग्ण मृत झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेचा वाद उफाळून आला. स्थानिक नागरिकांनी बोरुळ तलाव स्मशानभूमीवर आणि वैद्यकीय महाविद्यालय परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्मशानभूमीला विरोध दर्शवला आणि या दोनही पार्थिवावरील अंत्यसंस्कार रखडले. अंत्यविधी लवकर व्हावेत यासाठी नगर परिषद प्रशासन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी पुढाकार घेवून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री उशीरापर्यंत तोडगा निघू शकला नव्हता. अखेर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रात्री ११ वाजता येथे येवून अंत्यसंस्काराची जागा निश्चित करुन रात्री एक वाजता या दोन्ही पार्थिवावर दासोपंत समाधी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले.

रात्री एक वाजता सुरु झालेली अंत्यसंस्काराची प्रक्रिया पहाटे तीन वाजेपर्यंत चालली. नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर जगताप आणि स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अनंत वेडे हे स्वतः स्मशानभूमीत आपल्या सहका-यांसह हजर होते.

कोरोनाग्रस्त रुग्णांची अंत्यविधी स्मशानभूमीच्या जागेवरुन रखडले असल्याच्या बातम्यांना काल सोशल मीडिया व विविध वृत्तवाहिन्या, वर्तमान पत्रातून ठळक प्रसिद्धी मिळाली. याबद्दल अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया या व्यक्त केल्या होत्या. दरम्यान, रात्री एक नंतर का होईना या दोन कोरोनाग्रसत रुग्णांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यामुळे हा वाद आता शमला आहे.

अंत्यसंस्कारासाठी दासोपंत समाधी परिसरातील जागा निश्चित:  दरम्यान, काल नगर परिषद प्रशासन आणि महसूल प्रशासन कोविड रुग्णासाठी शहराबाहेरील सर्वे नंबर १७ मधील नगर परिषदेच्या जागेत शेड उभे करुन कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ही जागा निश्चित करण्याचा प्रयत्न करीत आहे अशी माहिती मिळत आहे. या ठिकाणी शेड उभारणीच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे असे प्रकार घडण्याची शक्यता निर्माण होणार नाही असे वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *