अधीक्षक अभियंत्यास साडेसहा लाख रूपये लाच घेताना पकडले; घरझडतीत सापडली 73 लाखांची रोकड

नांदेड: सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून रस्त्याच्या कामाच्या निवीदा स्वीकृतीसाठी अधीक्षक अभियंता गजेंद्र हिरालाल राजपूत, वय 54 वर्षे, यांच्यासाठी व आरोपी विनोद केशवराव कंधारे, वय 47 वर्षे, पद वरिष्ठ लिपिक, (वर्ग -3), नेमणूक सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांच्यासाठी दोन टेंडरचे 40 हजार रूपये असे एकूण 6 लाख 40 हजार पंचासमक्ष लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दरम्यान, आरोपी गजेंद्र राजपूत यांच्या कार्यालय व घराची झडती घेतली असता 73 लाख रूपयांची रोकड सापडली असून ती एसीबीने ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्रारदार यांना केदारगुडा, पिंगळी, डोंगरगाव, हदगाव, गोरलेगाव, गुरफळी रोड (ता. हदगाव, जि. नांदेड) या रस्त्यांचे दोन कामांचे टेंडर मिळाले आहे. सदर कामाच्या निवीदा स्विकृतीचे शिफारसीसाठी यातील तक्रारदार हे आरोपी क्र. 1) गजेंद्र राजपूत, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांना भेटले असता, त्यांनी मंजुर झालेल्या दोन टेंडरचे एकुण 14 कोटी 10 लाख रूपयाचे अर्धा टक्के रक्कम असे सरसकट 7 लाख रूपयाची मागणी केली व सदर पैसे दिले तर पुढे मुख्य अभियंता, नांदेड यांच्याकडे शिफारस करतो असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे संबंधीत टेबलचे लिपिक विनोद कंधारे यांना भेटले असता, त्यांनी त्यांचे व त्यांचेसोबत असलेले लिपीक जयंत धावडे यांच्यासाठी प्रत्येक टेंडरचे 25000/- रूपये असे एकुण 50,000/-रूपयाची मागणी केली. सदरचे पैसे हे लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने त्यांना ती देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे तक्रार दिली.

दरम्यान, दि. 31/10/2023 रोजी व दि. 01/11/2023 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने तक्रारदार यांना लाच मागणी पडताळणीसाठी पाठविले असता, तक्रारदार यांनी गजेंद्र हिरालाल राजपूत, वय 54 वर्षे, पद अधीक्षक अभियंता, (वर्ग-1) नेमणूक सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांची भेट घेतली व सात लाख रूपये जास्त होत आहेत. काही तरी कमी करा अशी विनंती केली असता,अधीक्षक अभियंता राजपूत यांनी तडजोडीअंती सहा लाख रूपयाची पंचासमक्ष मागणी केली व सहा लाख रूपये संबंधीत लिपीक कंधारे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे संबंधीत लिपीक कंधारे यांच्याकडे गेले व राजपूत साहेबांनी सहा लाख रूपये तुमच्याकडे देण्यास सांगितले व त्यांना दोन टेन्डरचे प्रत्येकी 20000/- असे एकूण 6 लाख 40 हजार घेण्यास वरिष्ठ लिपिक विनोद कंधारे यांनी पंचासमक्ष होकार दर्शविला.

त्यानंतर दि. 01/11/2023 रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेडचे कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून गजेंद्र हिरालाल राजपूत, वय 54 वर्षे, पद अधीक्षक अभियंता, (वर्ग-1) यांच्यासाठी व आरोपी विनोद केशवराव कंधारे, वय 47 वर्षे, पद वरिष्ठ लिपिक, (वर्ग -3), नेमणूक सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांच्यासाठी दोन टेंडरचे 40 हजार रूपये असे एकूण 6 लाख 40 हजार पंचासमक्ष लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

दरम्यान आरोपी गजेंद्र राजपूत,  अधीक्षक अभियंता, वर्ग-1 यांचे कार्यालय व घर झडतीतून लाचलुचपत प्रतिबंधक नांदेड पथकाने पंचासमक्ष एकूण 72,91,490 रुपये जप्त केले आहेत. दोन्ही लोकसेवकांना ताब्यात घेण्यात आले असून पो.स्टे. शिवाजीनगर, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *