# वैनगंगा नदीवरील पुलाच्या टोलवसुलीची फेर लेखा तपासणी करावी -अशोक चव्हाण.

मुंबई: भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलाच्या टोलवसुलीसंदर्भात विभागाने फेर लेखा तपासणी करावी,  असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. दरम्यान लातूर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरालगत जाणारा राष्ट्रीय महामार्ग नगरपालिकेच्या मागणीनुसार ६ कि.मी.च्या उड्डाणपुलासह बांधण्यात यावा, या मुद्द्याकडे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी लक्ष वेधले.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनातील दालनात टोलवसुली, भंडारा येथे नादुरूस्त महामार्गामुळे होत असलेली गैरसोय यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांची बैठक झाली.

नागपूर-भंडारा हा मार्ग सन २०१५ मध्ये पूर्ण झाला. मात्र, सध्या देखभाल आणि दुरूस्तीअभावी या  रस्त्याची दुर्दशा झाली आहे.  रस्ता खराब असूनही टोल वसुली मात्र सुरूच आहे.  याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.  ऑक्टोबर अखेरपर्यंत या रस्त्याची दुरूस्ती पूर्ण करुन रस्ता वाहतुकीस सुयोग्य व्हावा,  अन्यथा संबंधित कंत्राटदारांवर कडक कारवाई केली जाईल अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या.  त्याचप्रमाणे लातूर शहरालगत जाणारा राष्ट्रीय महामार्ग नगरपालिकेच्या मागणीनुसार ६ कि.मी.च्या उड्डाणपुलासह बांधण्यात यावा,  जेणेकरून शहरातील वाहतूक कोंडी टळेल आणि शहरवासियांच्या सुविधेला प्राधान्य मिळेल, या मुद्द्याकडे वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री.देशमुख यांनी लक्ष वेधले.

पूल बांधणीचा कार्यारंभ आदेश १६ नोव्हेंबर १९९८ रोजीचा असून ३२.५७ कोटी निविदा किंमत होती. सन २००१ पासून पथकर वसुली सुरू होऊन आजपर्यंत ३५८ कोटी रुपयाची वसुली करण्यात आली आहे. मुदतवाढीचे प्रकरण आणि विभागाने त्याला दिलेले आव्हान यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा तत्वावरील पथकर हक्कासहचे हे प्रकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे अनुदानित आहे, तर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे त्याची अंमलबजावणी सुरू आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री.अमित देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अ.अ. सगणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, उपसचिव राजेंद्र शहाणे, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नवी दिल्लीचे  महाव्यवस्थापक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *