पिंपरी: वाहतूक नियमन करताना महिला पोलिसाने एका तरुणीला थेट खिशात नोट ठेवायला लावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. याची दखल घेत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संबंधित महिला पोलिसाचे तडकाफडकी निलंबन केले आहे. गुरुवारी रात्री उशिरा याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. स्वाती सीताराम सोन्नर असे निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
सोन्नर या वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागात कार्यरत आहेत. मंगळवार, १५ डिसेंबर रोजी पिंपरी येथील शगुन चौकात काही पोलीस वाहतूक नियमन करीत हाेते. त्यावेळी सोन्नर यांनी एक दुचाकी थांबविली. त्यानंतर दुचाकीवरील तरुणीला खिशात नोट ठेवण्यास सांगितले. त्यानुसार संबंधित तरुणीने सोन्नर यांच्या मागच्या खिशात पैसे ठेवले. नजीकच्या इमारतीतून काही तरुणांनी घटना कॅमेऱ्यात कैद केली. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कृष्ण प्रकाश यांनी गुरूवारी रात्री उशिरा स्वाती सोन्नर यांच्या निलंबनाचे आदेश दिले.