मुंबई: कोरोना संकटाच्या या काळात संपूर्ण जगात वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित झाले असून सद्यस्थितीत डॉक्टरांचे काम सर्वात कठीण तर आहेच त्याचबरोबर चांगले डॉक्टर निर्माण करणे ही सुद्धा काळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेता महाराष्ट्रातील दुर्गम भागात वैद्यकीय शिक्षण संबंधित पायाभूत सुविधा, महाविद्यालये व रुग्णालये विकसित करण्यास महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले. या अनुषंगाने हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
हिंगोली येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, खासदार राजीव सातव, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री.देशमुख म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी ही जागा योग्य आहे का याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत पुढील आठवड्यात पाहणी करण्यात येईल. तसेच हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी पशुसंवर्धन विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाला जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया होणे आवश्यक आहे. जागा हस्तांतरीत झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. सिंधुदुर्ग, गोंदिया आणि नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत सध्या कार्यवाही सुरु असून हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामालाही गती देण्यात येईल.
नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान सलग 20 एकर जागा आवश्यक आहे. तसेच किमान 300 रुग्णखाटांचे रुग्णालय नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असणे आवश्यक आहे. यामुळेच वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत हिंगोली येथील महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची पाहणी आणि याबाबतचा अहवाल तयार करण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील: सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वाच्या (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) संभाव्य धोरणासंदर्भात मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांच्यासह डॉ.गुस्ताद डावर, डॉ. अजय भांडारवार, डॉ.संजय बिजवे, श्री.पागे उपस्थित होते. तर ऑनलाईन मिटींगद्वारे टाटा हॉस्पिटलचे डॉ. राजन बडवे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर, डॉ.भावेश मोदी, डॉ.चंद्रशेखर उपस्थित होते.
श्री.देशमुख म्हणाले की, सध्या कोविड-19 या विषाणूमुळे जगातील, देशातील आणि महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. असे असले तरी यापुढील काळात सामान्य माणसालाही उत्तम रुग्णसेवा मिळणे गरजेचे आहे. याला प्राधान्य देण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वानुसार वैद्यकीय महाविद्यालये चालविता येतील का याबाबतची शक्यता तपासून घेणे आवश्यक असल्याने याविषयावर सखोल चर्चा करण्यासाठीच आजची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील रुग्णसंख्या पाहता डॉक्टरांची संख्या वाढणे जितके आवश्यक आहे, त्याचप्रमाणे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा देणेही आवश्यक आहे. महाराष्ट्रातील एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निवडून येथे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वातून महाविद्यालय कसे चालते हे पाहण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत गठीत करण्यात आलेल्या समितीने सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर पूर्णपणे चालविण्यात येणारे टाटा हॉस्पिटल आणि गुजरात येथील हॉस्पिटलबाबत पूर्ण पाहणी करुन याबाबतचा अहवाल द्यावा, असेही श्री.देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. डॉ.संजय बिजवे यांनी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वाद्वारे येणाऱ्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालये कशी सुरु करता येतील याबाबत सादरीकरण केले.