..तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले: शरद पवार

पुणे: माझ्या सांगण्यावरून सुशिल कुमार यांनी पोलीस खात्यातील नोकरी सोडली. मी त्यांना पोटनिवडणुकीत आमदारकीचे तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तिकीट मिळवून देऊ शकलो नाही, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले होते. त्यानंतर मात्र शिंदे साहेबांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी ते स्वत:च्या कतृत्वावर आमदार खासदार,  राज्यमंत्री,  मंत्री,  मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि राज्यपाल झाले, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी काढले. 

पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा महर्षी पुरस्कार सोमवारी माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.   श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झालेल्या पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार होते. यावेळी माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महोत्सवाचे संयोजक माजी उपमहापौर आबा बागुल,जयश्री बागुल व्यासपीठावर उपस्थित होते.

सन्मानचिन्ह,मानपत्र,पुणेरी पगडी, चांदीची मुद्रा, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त कृतज्ञता म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात 125 वर्षे पुर्ण झालेल्या कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे विश्वत अध्यक्ष अ‍ॅजड. प्रताप परदेशी आणि प्राचीन पर्वती देवदेवेश्वर संस्थानचे अध्यक्ष रमेश के. भागवत यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात येईल.

शरद पवार म्हणाले, पुण्यामध्ये जेवढे पुरस्कार दिले जातात, तेवढे देशातील कुठल्याच शहरात दिले जात नाहीत. पुरस्कार देणारे, पुरस्कार ठरवणारे आणि पुरस्कार स्वीकारणारे ही ठाराविक मंडळी आहे. पुरस्कार ठरवणारे देखील डॉ. सतीश देसाई, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला हे लोक तर निवेदनासाठी प्रकाश पायगुडे, सुधीर गाडगीळ हे लोक असतात. निवेदक पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचे जीवन खुलविण्याचे काम करतात.

सुशिलकुमार शिंदे म्हणाले, शरद पवार हे महाराष्ट्राचे व देशाचे आकर्षण आहेत. त्यांनीच मला हात धरून राजकारणात आणले. शरदराव खर्‍या अर्थाने यशवंतराव चव्हाण यांचे मानस पुत्र आहे. त्यांचे अतूट नाते आम्ही जवळून पाहिले आहे. यशवंतरावांशी असलेले नाते पवार साहेबांनी मुंबईल यशवंतराव चव्हाण रिसर्च सेंटरच्या माध्यमातून जपले आहे. शरद पवार माझ्यापेक्षा साडे आठ महिन्यांनी मोठे आहेत, मात्र ते विचारांनी, कर्तृत्वाने मोठे आहेत, ते कायमच मोठे राहतील. समाजातील न दिसणारी माणसं पकडून शरद पवारांनी यांनी त्यांचे दर्शन समाजाला घडवले. तेव्हढेच नाही तर त्यांना उमेदवारी, देवून निवडूनही आणायचे. मी त्यांच्याकडून राजकारणातील डावपेच शिकलो.

कार्यक्रमात आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. ते म्हणाले की, मैत्री कशी असावी याचे देशातील उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार व सुशिलकुमार शिंदे आहे. आपल्या मित्राला उंचीवर नेण्याचे काम शरद पवारांनी मोकळ्यापणांनी केले. असा सत्कार म्हणजे एका अर्थाने राजकीय गुरुने राजकीय शिष्याचाच सत्कार आहे. यावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करुन प्रतिसाद दिला. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन करेले तर घनशाम सावंत यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *