# यंदाही हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच.

मुंबई: नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं हे अधिवेशन मुंबईत घेतलं जाणार आहे. मागील वर्षी कोरोनामुळे हे अधिवेशन मुंबईत घेण्यात आले होते. यावर्षीही हे अधिवेशन मुंबईतच होणार असल्याने सलग दोन वर्षे हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार आहे.

जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन संपतानाच हिवाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली होती. यानुसार ७ डिसेंबर २०२१ रोजी नागपूर येथे विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन होईल असं ठरलं. मात्र, या अधिवेशनाला काही दिवस शिल्लक असताना देखील नागपूरमध्ये तयारीसाठी हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून यंदाचं हिवाळी अधिवेशन देखील नागपूर ऐवजी मुंबईलाच होईल असा तर्क लावला जात होता. अखेर हा अंदाज खरा ठरला आहे.

अमली पदार्थांच्या मुद्द्यावरुन अधिवेशन गाजणार:

दरम्यान, महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी होणार असल्याचं म्हटलं होतं. मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सध्या राज्यात सुरु असलेल्या अमली पदार्थांच्या मुद्द्यावरुन माझ्यावर बरेच आरोप केले जातील असं मलिक यांनी म्हटलं. मात्र, त्याच वेळी त्यांनी आपण या आरोपांना उत्तर देताना अशी काही माहिती समोर आणणार आहोत की ज्यामुळे भाजपाच्या नेत्यांना कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. बऱ्याच लोकांचे बरेच कनेक्शन या ड्रग्ज प्रकरणात आहेत, असंही नवाब मलिक म्हणाले होते. वानखेडेंच्या कुटुंबियांना गोवलं जात असल्याचा आरोप चुकीचा असल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं.

७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होत असून त्यामध्ये माझ्यावर भाजपाकडून बरेच आरोप आणि हल्लाबोल केला जाईल, असं मलिक यांनी म्हटलं आहे. सध्या मी कोणत्याही नेत्याच्या आरोपाला उत्तर देऊन प्रकरणावरुन लक्ष डायव्हर्ट करु इच्छित नाही. हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक नावं समोर येणार आहेत, असं मलिक म्हणाले होते. मुंबईतील क्रूझ पार्टीच्या आयोजकांपैकी एक असणाऱ्या काशीफ खानला अटक झाल्यानंतर सखोल चौकशीमध्ये अनेकांची नावं समोर येतील. अनेकांच्या चेहऱ्यावरील मुखवटा हटेल. त्याच्याकडे किती लोकांचा पैसा आहे. त्याच्या माध्यमातून काय काय होतं आणि कोणत्या गोष्टी चालतात हे सुद्धा समोर येईल, असंही मलिक म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *