अजीतकुमार कुरुप यांना यंदाचा स्नेहसंवर्धन पुरस्कार


अंबाजोगाई: आंतरभारती, अंबाजोगाईच्या वतीने दर वर्षी दिला जाणारा स्नेहसंवर्धन पुरस्कार यंदा मूळ केरळचे राहणारे उषा टायर वर्क्सचे अजीतकुमार शिवकुमार कुरुप यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार १५ ऑगस्ट २०२२ रोजी सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. आंतरभारतीचे राष्ट्रीय सचिव अमर हबीब व मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष दगडू लोमटे हे या समारंभाचे प्रमुख अतिथी असणार आहेत.

पुरस्कार प्राप्त अजीतकुमार यांचा परिचय: अजीतकुमार यांचे वडील शिवकुमार कुरूप हे १९८४ साली त्यांचे भाचे उन्नीकृष्णन नायर यांच्या समवेत केरळ राज्यातील पथ्थनम तिट्ठ या जिल्ह्यातील पंडलम गावातून अंबाजोगाईला आले व पंचायत समिती समोर किरायाच्या जागेत त्यांनी पंक्चर काढणे,  टायर रिवायडिंग करणे याचा छोटेखानी व्यवसाय सुरु केला. नंतर त्यांनी जुन्या पेट्रोल पंपा जवळ आपला व्यवसाय नेला. काही वर्षात त्यांनी मोरेवाडी येथे बीड हाय-वे लगत जमिन विकत घेतली व तेथेच स्वतःचा व्यवसाय स्थिर केला. या दरम्यान त्यांचा मुलगा अजीतकुमार याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले व वडिलांना व्यवसायात हातभार लावण्यासाठी १९९७ साली तो अंबाजोगाईला आला. पण अगदी ३ वर्षात सन २००० साली त्यांचे वडील शिवकुमार कुरूप यांचे अल्पशा आजराने निधन झाले व त्यानंतर अजीतकुमार यांनी स्वतःच्या खांद्यावर व्यवसायाची जबाबदारी घेतली व तेव्हापासून आजपर्यंत ते अंबाजोगाईमधे आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठ आहेत. त्यांचे अंबाजोगाईत अनेकांशी मैत्रीचे संबंध आहेत.

यापूर्वी पुरस्काराने यांचा झाला सन्मान: आंतरभारती अंबाजोगाईने २०१४ साली प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी यांना पुरस्कार देऊन स्नेहसंवर्धन पुरस्काराची सुरुवात केली. त्या नंतर शशिकांत रुपडा (मनीष स्वीट), शंकर मेहता (मेवाड हॉटेल), प्राचार्य एम. बी. शेट्टी (तंत्र महाविद्यालय), आनंद अंकम (श्रीनिवास हेअर सलून), सुशीला शेट्टी (उडपी हॉटेल), शेख शमीम (सिमेंट वस्तूंचे निर्माते), राजू जांगीड (सुतार काम) यांना सन्मानित करण्यात आले आहे.

आंतरभारती अंबाजोगाईचे अध्यक्ष दत्ता वालेकर, सचिव वैजनाथ शेंगुळे, कोषाध्यक्ष राजाभाऊ पिंपळगावकर, कार्यक्रमाचे संयोजक अनिकेत डिघोळकर, संतोष मोहिते, ज्योती शिंदे, शरद लंगे  व अन्य सहकारी कार्यक्रमाची तयारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *