पुणे: मुळात निवडणूक लढवायची ती लोकांसमोर जाऊन आपले विचार मांडता येतात म्हणून आणि त्यातून सत्ता मिळालीच तर तिचा वापर लोकांसाठीची धोरणं बनवणं आणि ती अंमलात आणणं यासाठी करायचा. व्यक्तिगत लाभासाठी किंवा कुठले हितसंबंध जपण्यासाठी सत्ता नसते. हा विचार घेऊन तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं, असं मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, नेते आणि लेखक, पत्रकार पन्नालाल सुराणा यांनी व्यक्त केलं.
ते पुढे म्हणाले, समाजासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक तरुण आहेत. रचनात्मक, संघर्षात्मक असं मोठं काम त्यांनी उभं केलेलं आहे. तेव्हा देशातल्या अशा तरुणांनी समाजहिताचा विचार करून थेट राजकारणात आलं पाहिजे. केवळ दबाव गट निर्माण करून काही साध्य होतं नाही. मीही याच भावनेतून अनेक निवडणुका लढलो. त्यात प्रत्येकवेळी अपयश आलं पण त्याचंही कधी वाईट वाटलं नाही. याचं कारण व्यक्तिगत लाभाची कुठली अपेक्षा त्यामागे नव्हती. अशी कुठलीही अपेक्षा न बाळगणारा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात राजकारणात आला तर मोठं परिवर्तन घडू शकतं. त्यासाठी विचारी तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. त्यांना दिशा दाखवण्याचं, मार्गदर्शन करण्याचं काम माझ्यासारखी मंडळी आनंदाने करतील.
मनोविकास प्रकाशनाने सुरू केलेल्या ‘मनोविकास लाईव्ह’च्या नवव्या भागात ते बोलत होते. ‘फकिरीचे वैभव’ हे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय विल्हेकर यांचे, ‘लढे आणि तिढे’ हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांचे आणि ‘पायपीट समाजवादासाठी’ हे पन्नालाल सुराणा यांचे अशी तीन आत्मकथनं मनोविकास प्रकाशनातर्फे लवकरच वाचकांच्या हाती सोपवली जाणार आहेत. त्यानिमित्ताने पन्नालाल सुराणा यांच्याशी मुक्त संवाद असा हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी सुराणा यांच्याशी संवाद साधला, तर मनोविकासचे संपादक विलास पाटील यांनी प्रास्ताविक केले.
पन्नालाल सुराणा म्हणाले, आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव वाढल्यानंतर इंदिराजींनी निवडणुका घेतल्या आणि त्यातून जनता पक्ष सत्तेवर आला. पण तीन ज्येष्ठ नेत्यांनी बाळगलेली पंतप्रधानपदाची अपेक्षा यामुळे पक्षाला फार काळ सत्ता टिकवता आली नाही. अर्थात या सत्तेच्या राजकारणात समाजवादी पक्षानं आणि नेत्यांनीही जनसंघाबरोबर जायला नको होतं. आज देशात गोवंशहत्याबंदीवरून ज्या पद्धतीने दहशत पसरवली जात आहे. झुंडीने निरपराध्यांना मारलं जातंय ते पाहाता आणीबाणीपेक्षाही वाईट स्थिती आहे असं वाटतं आणि याला आम्ही म्हणजे समाजवादी चळवळीतले लोक काही प्रमाणात जबाबदार आहोत याची मनात कुठेतरी खंत आहे.’
या मुक्त संवादात पन्नालाल सुराणा यांनी अनेक प्रश्नांवर अत्यंत मोकळेपणाने मतं मांडली. आपल्या कामाविषयी, समाजवादासाठी केलेल्या पायपीटीविषयी सविस्तर मांडणी करत ते म्हणाले, माणसांकडून चुका होतात. पण त्यात सुधारणा करत सतत पुढे जात राहीलं पाहिजे. त्यादृष्टिकोनातून आम्ही सातत्याने विविध पातळ्यांवर काम करत पुढे निघालो आहोत. मध्येच कुठे अडकून राहिलेलो नाही आहोत ही माझ्या दृष्टीने समाधानाची बाब आहे.’