भोकरदन तालुक्यातील पळसखेडा (पिंपळे) येथील दुर्घटना
जालना: शेतातील पिकांना पाणी देताना विद्युत मोटर चालू करताना शाॅक लागून विहिरीत पडल्याने एकाच घरातील तीन भावांचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल बुधवारी रात्री उशिरा भोकरदन तालुक्यातील पळसखेडा (पिंपळे) येथील शेतात घडली. घटना रात्री उशिरा घडल्याने आज सकाळी उघडकीस आली.
दिवसभर वीजपुरवठा राहत नसल्यामुळे बुधवारी रात्री भोकरदन तालुक्यातील पळसखेडा (पिंपळे) येथील ज्ञानेश्वर जाधव (27), रामेश्वर जाधव (25) आणि सुनील जाधव (18) हे सख्खे भाऊ गट नं. 9 मधील शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. विद्युत मोटार सुरू करीत असतांना सर्वात मोठा भाऊ ज्ञानेश्वर जाधव हा विजेचा शॉक लागल्यामुळे तुडुंब भरलेल्या विहिरीत पडला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मदतीसाठी धावलेल्या रामेश्वर जाधव आणि सुनील जाधव यांनाही विजेचा जोरदार शॉक लागल्याने तेही विहिरीत पडले. विहिरीतही करंट उतरल्यामुळे या तीनही भावांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
रात्री उशिरा घटना घडल्यामुळे परिसरात कोणीही नसल्यामुळे घटना समजण्यास उशीर झाला. दरम्यान, घटनेची माहिती कळताच भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांच्यासह हसनाबादचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष घोडके, सहायक फौजदार देशमुख, पोहेकाॅ. विष्णू बुनगे, भापकर आदींनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले. ग्रामस्थांच्या मदतीने बाजेच्या साह्याने या तीनही भावांचे मृतदेह विहिरीतून आज सकाळी बाहेर काढण्यात आले. राजूर येथील आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविण्यात आले आहेत. एकाच घरातील तीन भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे पळसखेडा गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. सर्वात मोठ्या भावाचे लग्न तीन महिन्यापूर्वी झालेले होते, तर लहान दोघे भाऊ अविवाहित होते.