जालना: जालना जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या शंभरपेक्षा अधिक झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आज दि.28 मे गुरुवारी रात्री 12 वाजेपासून 31 मे च्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी याबाबतचे आदेश आज गुरुवारी सायंकाळी बजावले आहेत.
या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधीक्षक, जालना व उपविभागीय दंडाधिकारी, सर्व उपविभाग जिल्हा जालना, सर्व तालुका दंडाधिकारी जिल्हा जालना, मुख्याधिकारी सर्व नगर परिषद व नगर पंचायती जिल्हा जालना यांच्यावर राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये नमूद केले आहे.
यांना असेल संचारबंदीत सूट: वैद्यकीय सेवा, सर्व शासकीय व खाजगी रुग्णालये, दवाखाने, रुग्णवाहिका सर्व औषधी दुकाने, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, खत, बी-बियाणे यांची दुकाने, खत वाहतूक व त्यांचे गोदाम. तसेच कापूस, गहू, हरभरा खरेदी, अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये महसूल, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, ग्रामविकास, अग्निशमन, कोविड- 19 कोरोना संबंधित कर्तव्यावर असणारे अधिकारी, कर्मचारी, औद्योगिक कारखाने, गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॅानिक मिडिया यांचे संपादक, वार्ताहार, प्रतिनिधी, वितरक आदी. तसेच पेट्रोल पंप, तेथील कर्मचारी व त्यांची वाहने यांना संचारबंदीत सूट देण्यात आली आहे.
पुन्हा पाच पॉझिटिव्ह, संख्या 115 वर: जालना जिल्ह्यात आणखी पाच नवीन पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 115 वर पोहचली आहे. जालना तालुक्यातील नूतनवाडी येथील तीन, परतूर येथील एक, आणि मंठा तालुक्यातील कानडी येथील एक याप्रमाणे पाच रुग्णांचे अहवाल आज गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाले असून आता जिल्ह्याची एकूण बाधित रूग्णांची संख्या 115 वर पोहचलीआहे. गेल्या काही दिवसात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील जनतेसह जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
पालकमंत्री राजेश टोपे यांची कोविड रुग्णालयास भेट: राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी 27 मे रोजी रात्री उशिरा जालना येथील कोविड हास्पिटलला भेट देत रुग्णांना देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच रुग्णांच्या प्रकृतीमध्ये त्वरेने सुधारणा होण्यासाठी रुग्णांना औषधोपचाराबरोबरच पौष्टीक आहार देण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची उपस्थिती होती.