मुंबई: राज्यातील तीन ज्येष्ठ पत्रकारांचा आज कोरोनाने मृत्यू झाला. यामध्ये उस्मानाबाद येथील जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा (वय69), श्रीरामपूर येथील लोकसत्ताचे पत्रकार अशोक तुपे (वय57) व ठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे (वय67) यांचा समावेश आहे.
मोतीचंद बेदमुथा यांना कोरोना झाल्याने त्यांच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. लोकसत्ताचे श्रीरामपूर येथील पत्रकार अशोक तुपे यांनाही कोरोना झाला होता. मात्र, त्यातून ते बरे झाले होते. त्यांना आज ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांचाही कोरोनाने बळी घेतला. राज्यात कोरोनानं बळी घेतलेल्या पत्रकारांची संख्या आता 105 झाली आहे.
महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात महणजे गेल्या 22 दिवसात कोरोनानं तब्बल 33 पत्रकारांचे बळी घेतले आहेत. ऑगस्ट 2020 ते 17 एप्रिल 2021 या कालावधीत 105 पत्रकारांचे बळी गेले आहेत. 2000 पेक्षा जास्त पत्रकार बाधित झाले आहेत. अनेक पत्रकारांकडे उपचारासाठी पैसे नाहीत आणि ज्या पत्रकारांचे निधन झाले आहे त्यांची कुटुंबं रस्त्यावर आली आहेत. तरी केंद्राच्या धर्तीवर राज्याने देखील मृत पत्रकाराच्या नातेवाईकांना 5 लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने केली आहे.