बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा केज रस्त्यावरील येळंबघाट येथील घटना
बीड: नांदेड जिल्ह्यातील तरुणाने आपल्या प्रेयसीवर अॅसिड टाकले त्यानंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा केज रस्त्यावरील येळंबघाट येथे ही घटना घडली. बीडच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून अटक केली आहे. अविनाश राजूरे असं या नराधम प्रियकराचं नाव आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील अविनाश राजूरे याचे त्याच गावातील २२ वर्षीय तरुणी सोबत प्रेमसंबंध जुळले होते. ते दोघेही पुण्यात एकत्र राहत होते. दिवाळी निमित्त शनिवारी हे दोघेही दुचाकीने पुण्याहून गावाकडे निघाले होते. शनिवारी ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पहाटे तीनच्या सुमारास बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा केज रस्त्यावरील येळंबघाट येथे अविनाशने रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी केली. त्यानंतर प्रेयसीला रस्त्यापासून दूर खड्ड्यात नेऊन तिच्यावर प्रथम अॅसिड टाकले. त्यानंतर पेट्रोल ओतून तिला पेटवून देऊन तो तिथून निघून गेला.
दरम्यान, जळीत तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला परंतु पहाटेची वेळ असल्यानं कुणीही मदतीला येऊ शकले नाही. या घटनेत ती मोठ्या प्रमाणावर भाजली. तशाच अवस्थेत ती तरुणी तब्बल १२ तास रस्त्यालगत पडून होती. दुपारी तीनच्या सुमारास एका वाहन धारकाला तिचा आवाज ऐकून त्यानं तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर जखमी तरुणीला पोलिसांनी प्रथम नेकनूरच्या आरोग्य केंद्रात व त्यानंतर बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला पोलिसांनी 24 तासांत ठोकल्या बेड्या:
अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या अॅसिड टाकून व पेट्रोल टाकून जाळून तरुणीच्या हत्ये प्रकरणी अखेर नराधम प्रियकाराला अटक करण्यात आली आहे. अविनाश राजूरे या आरोपीला नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथं पोलिसांनी पकडलं आहे. घटनेच्या 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.