पुणे: आजची लोकशाही व्यवस्था ही चांगली नाही, तर तो बदमाशांचा खेळ झाला आहे. अशा ही काळात उल्हास पवार यांच्यासारखे राजकारणी आपल्यातील चांगुलपणा टिकवून विविध क्षेत्रात कार्य करीत मार्गदर्शकाची भूमिका निभावत आहेत. महाराष्ट्रातील विविध सांस्कृतिक चळवळींना पाठबळ देण्याचे कामही उल्हास पवार करत असल्याचे ज्येष्ठ संपादक व विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाईचा नववा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार उल्हास पवार यांना ज्येष्ठ संपादक व विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर समितीचे सचिव दगडू लोमटे व उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे हे उपस्थित होते.
यशवंतरावांच्या भाषणात विचारांची दिशा असायची भारतीय लोकशाही जगाला दिशा देणारी आहे. परंतु मागील काही वर्षांत देशात सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांना महात्मा गांधी, नेहरू, महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा विसर पडला आहे. आपण आयुष्यभर बहुश्रूतपणा जोपासला त्यामुळेच या सत्काराने आपला सन्मान झाल्याचे माजी आमदार उल्हास पवार यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी विश्वजीत धाट व त्यांच्या संचाने स्वागतगीत सादर केले. या प्रसंगी ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव आणि सत्कारमूर्ती उल्हास पवार यांचे स्वागत स्मृती समितीचे कोषाध्यक्ष सतीश लोमटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी केले. प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांचा परिचय करून दिला. वि.वा. गंगणे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. मेघराज पवळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शशांक लोमटे यांनी मानले.
व्हील चेअरसाठी 50 हजार रूपयांची मदत:
या प्रसंगी स्व.भगवानराव लोमटे, स्व.गजराबाई लोमटे, स्व.बालासाहेब लोमटे (नवाब) आणि स्व.अॅड. अण्णासाहेब लोमटे(नवाब) स्व. नागोराव लोमटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिभा देशमुख, अनंत लोमटे, शरद लोमटे, आणि महेश लोमटे यांच्या वतीने राजू करंजकर यांना मान्यवरांच्या हस्ते ईलेक्ट्रीक व्हील चेअरसाठी 50 हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला.