# विदर्भात दोन दिवस अतिवृष्टी; मध्यमहाराष्ट्र, कोकणात काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज.

पुणे: राज्यात गेल्या आठवड्यापासून उघडीप दिलेला पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील दोन दिवस विदर्भात काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्यमहाराष्ट्र, कोकण अणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात 9 ऑगस्टपासून सलग 15 दिवस घाटमाथ्यासह अगदी मध्यमहाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर सलग आठवडाभर पावसाने उघडीप दिली होती. आता मात्र, बुधवारपासून (दि.26) राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. विदर्भात काही भागात अतिवृष्टी तर मध्यमहाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस बरसणार आहे. हा पाऊस 29 ऑगस्टपर्यंत राहणार आहे.

झारखंड आणि आसपासच्या भागात कमी दाबाचा पट्टा तसेच चक्रीय स्थिती कार्यरत आहे. त्यामुळे मध्य प्रदेश आणि विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याबरोबरच अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे तयार झाले आहे. हे वारे पुढील दोन दिवस ईशान्य भारताकडे वाहणार आहे. यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि नाशिक भागातील घाटमाथ्यावर मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *