# महिला अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने कार्यालय परिसराचा वृक्ष लागवडीने कायापालट.

अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांचा पुढाकार; मानवलोकसह व्यापारी प्रतिष्ठानांचे सहकार्य

अंबाजोगाई: येथील अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांनी कार्यालय परिसरातील मोकळ्या जागेत वृक्ष लागवड आणि फळबाग लागवड प्रकल्प राबले असून या प्रकल्पांतर्गत ४५ प्रजातींच्या सुमारे ५९२२ रोपांची लागवड करण्यात आली आहे.

अंबाजोगाई येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची सुरुवात २००८ साली झाली. २००८ ते २०१४ पर्यंत अप्पर जिल्हाधिकारी यांचे हे कार्यालय पाटबंधारे विभागाच्या जुन्या इमारतीतच राहीले. २०१४ मध्ये मोरेवाडी परिसरातील विस्तीर्ण जागेतील नवीन बांधकाम केलेल्या इमारतीत हे कार्यालय स्थलांतरीत झाले. मात्र, आजपर्यंत लाभलेल्या अप्पर जिल्हाधिकारी यांनी आपल्या कार्यातून ना या कार्यालयाला ओळख निर्माण करुन देण्याचा प्रयत्न केला ना या कार्यालय परिसरातील मोकळ्या जागेला.

३० जून २०२० रोजी मंजुषा मिसकर यांनी या कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आणि नवीन व्हिजन असलेल्या या महिला अधिका-याने या कार्यालयाचा कायापालट करण्याचे नियोजन केले. पहिल्याच टप्यात कार्यालयीन कामकाजात सुधारणा करीत त्यांनी कार्यालय परिसरातील मोकळी जागा विकसीत करण्याचा चंग बांधला. यावर्षी पावसाच्या सुरुवातीसोबतच या मोकळ्या परिसरात वृक्ष लागवड आणि फळबाग लागवड प्रकल्प राबवण्याचा चंग बांधला. शासकीय नियमांच्या अधिन राहून मंजुषा मिसकर यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित प्रमुख अधिका-यांची बैठक बोलावून वृक्ष लागवड आणि फळबाग लागवड प्रकल्पासंबंधीचा मानस जाहीर केला. या विभागातील वनपरीक्षेत्रपाल शंकर वरवडे यांनी या प्रकल्पास अनुकुलता दर्शवताच या प्रकल्प निर्मितीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. या परिसरात अस्ताव्यस्त वाढलेली रानटी बाभळीची झाडं नष्ट करुन जमिनीची मशागत करुन जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच वृक्ष लागवडी अंतर्गत ४६०० रोपांची, फळबाग लागवड प्रकल्पात ५० रोपांची तर इतर मोकळ्या जागेत १३२२ रोपांच्या ४५ प्रजातींच्या सुमारे ५९२२ रोपांची लागवड या कार्यालयाच्या मोकळ्या जागेत करण्यात आली. एवढेच नव्हे तर परिसरात लागवड करण्यात आलेल्या सर्व रोपांच्या संगोपणाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

वृक्ष लागवड प्रकल्पात नैसर्गिक वातावरणात वाढणाऱ्या विविध प्रजातींच्या रोपांचा समावेश आहे, तर फळबाग लागवडीत आंबा, जांभूळ, आवळा, सीताफळ आदी फळांच्या ५० रोपांचा समावेश आहे. कार्यालय परिसरातील संरक्षण भिंती शेजारी रिकाम्या असलेल्या व वृक्ष लागवड जिथे करता येणे शक्य नाही अशा ठिकाणी १,३२२ रोपांची लागवड करण्यात आली आहे.

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आलेल्या या ५९२२ रोपांच्या लागवडीसाठी भरीव सहकार्य मानवलोकचे अनिकेत लोहिया, नवजीवन मशनरी स्टोअर्स, रचना रोपवाटिका, सोमेश्वर अॅग्रो एजन्सी, दत्तकृपा अॅग्रो एजन्सी, सचिन कृषी सेवा केंद्र, बालाजी मशनरी स्टोअर्स, सार्थक मशनरी स्टोअर्स, पाणी फाऊंडेशन यासह इतर प्रतिष्ठान आणि सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद अंबाजोगाई यांनी केले आहे.

अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांच्या कल्पनेतील वृक्ष लागवड, फळबाग लागवड प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्यासाठी उपविभागीय अधिकारी शोभादेवी जाधव, उपविभागीय भूसंपादन अधिकारी नीलम बाफना, माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी, औष्णिक विद्युत केंद्र परळीचे अधीक्षक अभियंता, अंबाजोगाईचे तहसीलदार संतोष रुईकर, वनपरीक्षेत्रपाल शंकर वरवडे, कृषी अधिकारी लोखंडे, मंडळ अधिकारी पारेकर, वरिष्ठ लिपिक नाना गायकवाड व इतरांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *