# आदिवासी जीवन पद्धती, सभ्यतेचे संरक्षण केले पाहिजे -श्रीश्री रवीशंकर.

पुणे: महाराष्ट्रातील आदिवासी शेतकरी बांधवांना आत्मनिर्भर बनविणे आणि झारखंडमधील पंचायत राज संस्थांना बळकट करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने पुढाकार घेत केंद्रीय आदिवासी मंत्रालयाच्या सहकार्याने मंगळवारी दोन उत्कृष्टता केंद्र सुरू केली आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक व आध्यत्मिक गुरू श्री श्री रवीशंकर आणि केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

आदिवासी युवकांचे सशक्तिकरण करण्याचे उद्दिष्ट ठेऊन त्यांना परिवर्तनाचे वाहक करण्यासोबतच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, त्यांच्यापर्यंत मार्केटिंगच्या सुविधा पोहोचवण्याचे काम या दोन उत्कृष्टता केंद्रांच्या माध्यमातून केले जाणार आहे.

याबाबत श्री श्री रविशंकर म्हणाले, आदिवासी सभ्यतेपासून आपल्याला खूप काही शिकण्याची गरज आहे. मी जेव्हा जेव्हा आदिवासी राहत असलेल्या ठिकाणी गेलो तेव्हा तेव्हा ते पर्यावरण स्वच्छ ठेवत असल्याचे आढळून येते. आपण त्यांच्या जीवन पद्धती आणि सभ्यतेचे संरक्षण केले पाहिजे आणि त्यांना आवश्यक मदतही केली पाहिजे.

आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे घाटशिला येथे चालवल्या जात असलेल्या आदिवासी विद्यालयाबद्दल सांगताना श्री श्री रविशंकर म्हणाले, येथील मुले पारंपरिक शिक्षणसोबतच आधुनिक शिक्षण आणि उद्योग कला आत्मसात करत आहेत. यामुळे कोणीही बेरोजगार राहणार नाही.

मानसिक स्वास्थ्य, स्वच्छता आणि विकासासाठी योग आणि ध्यान हे प्रत्येक आदिवासी गावापर्यंत पोहोचवण्यावरही श्री श्री रविशंकर यांनी भर दिला.

झारखंडमधील 900 युवक प्रशिक्षित करणार:

झारखंड येथील पहिल्या गुणवत्ता केंद्रातंर्गत संघटनेद्वारे अनुसूचित जमातीतील 900 युवकांना परिवर्तनाचे वाहक होण्यासाठी प्रशिक्षीत केले जाईल. यासाठी झारखंड राज्यातील सहा वेगवेगळ्या ब्लॉकमधून 30 ग्रामपंचायती निवडल्या जाणार आहेत.

आदिवासींच्या जमातीच्या वैधानिक संरक्षणासाठी अनेक योजना आहेत. मात्र, त्याची माहिती तळागाळात पोहचलेली नाही. प्रशिक्षित झालेले हेच युवक पुढे आपल्या सर्व जमातीला वैधानिक संरक्षण आणि योजनासंबंधी साक्षर करतील. परंपरागत ग्राम वनवासी आपल्या अधिकाराबद्दल जागरूक होऊन राज्य आणि केंद्र शासनाद्वारे मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सहकार्यातून आदिवासी मंत्रालय अनुसूचित जमातीचा जीवनस्तर सुधारुन पंचायती राज संस्थांना सशक्त करून आत्मनिर्भर करून देण्याचे काम सुरू करत असल्याबद्दल आदिवासी मंत्रालयाच्या राज्यमंत्री रेणुका सिंग यांनी समाधान व्यक्त केले.

भारत व्यक्ती विकास केंद्राचे अध्यक्ष प्रसन्ना प्रभू म्हणाले, आर्ट ऑफ लिव्हिंगकडून सामुदायिक सशक्तीकरणाचे महत्वपूर्ण कार्य सुरू आहे. यातून आदिवासी ग्राममध्ये निश्चितच परिवर्तन होईल.

औरंगाबाद जिल्ह्याची निवड:
देशातील दुसरे गुणवत्ता केंद्र मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात उभारले जाणार आहे. या माध्यमातून 10 हजार आदिवासी शेतकऱ्यांना टिकाऊ व पारंपरिक शेती पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाईल.

शतकानुशतके पारंपरिक टिकाऊ शेती जपून ठेवणाऱ्या या आदिवासी क्षेत्रात देखील आता हळूहळू विषाचा अर्थात रसायनाचा शिरकाव होऊ लागला आहे. पारंपरिक शेतीवर, पिकांच्या विविधतेवर आणि जमिनीच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत आहे. श्री श्री इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रीकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी (एसएसआयएएसटी) देशभरातील 22 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीचे प्रशिक्षण देत आहे. एसएसआयएएसटीने आता आदिवासी मंत्रालयाच्या सहयोगाने औरंगाबाद जिल्ह्यात आदिवासी शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याचे कार्य हाती घेतले आहे

आदिवासी गावे घेणार दत्तक:
या तीन वर्षाच्या प्रकल्पात एसएसआयएएसटी दहा आदिवासी गावांना दत्तक घेऊन दहा हजार शेतकऱ्यांना गौ आधारित टिकाऊ पारंपरिक शेती पद्धतीबद्दल प्रशिक्षित करणार आहे. या मॉडेलमध्ये ग्रामीण क्षेत्रातील 10 युवकांना मार्गदर्शक म्हणून तयार केले जाईल. या प्रकल्पाच्या काळात इतर लोकांना ते आपल्याबरोबर सहभागी करून घेऊन कार्य करतील. एसएसआयएएसटी यांना पीजीएस जैविक शेतीचे सर्टीफिकीट मिळवून देण्याबरोबरच मार्केटिंगची व्यवस्थाही करेल. देशी बी बियाणांचा संग्रह करून बँक स्थापन करेल. शिवाय स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण आणि शेतकऱ्यांना बियाणांच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवणार आहे, असे एसएसआयएएसटीचे ट्रस्टी डॉ.प्रभाकर राव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *