औरंगाबादः औरंगाबादच्या किलेअर्क परिसरातील कला महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेले हर्सूल तुरूंगातील दोन कोरोनाबाधित कैदी पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन कैद्यांपैकी एकावर खुनाचा तर दुसऱ्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल आहे.
हर्सूल तुरूंगातील २९ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्यावर किलेअर्क परिसरातील कला महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. रविवारी रात्री बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारी लघुशंकेसाठी गेल्याची संधी साधून या कोविड सेंटरच्या पहिल्या मजल्यावरील दोन आरोपींनी खिडकीचे गज वाकवले आणि बेडशीटची दोरी बनवून तिच्या साह्याने खाली उतरून पळ काढला. तेथे तैनात असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांनी ही बाब लक्षात आणून देताच तुरुंग अधिकारी यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
पळून गेलेल्या दोन कैद्यांपैकी एक कैदी आक्रम खान गयास खान हा औरंगाबादच्या जटवाडा येथील असून त्याच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात ३०२, १२० (ब) चा गुन्हा दाखल आहे. दुसरा कैदी सय्यद सैफ सय्यद असद हा शहरातील नेहरू नगरचा रहिवासी असून त्याच्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात ४९८ ( अ) (ब)(क), ४२० चा गुन्हा दाखल आहे.