दोन वर्ष जनसेवेची..

राज्य शासनाला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल औरंगाबाद शहरात ‘दोन वर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची’ चित्र प्रदर्शन भरवण्यात आलंय. इथे राज्य शासनाचे महत्त्वपूर्ण निर्णय, उपक्रम एकाच छताखाली पहावयास, वाचावयास मिळत आहेत. जिल्हा परिषदेच्या समोरील सिमंत मंगल कार्यालयातील या प्रदर्शनाचे वेळ सकाळी 10 ते 8 आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालयाने भरवलेल्या या पाच ‍दिवसीय प्रदर्शनाचा आज (पाच मे) समारोप होतोय. जागरूक नागरिक, अभ्यासक, संशोधक आदींनी या अभ्यासपूर्ण अशा शासनाच्या चित्रप्रदर्शनाचा लाभ घेतलेला आहेच, तुम्हीही हा घ्यायलाच हवा. 

शहरातील औरंगपुरा परिसरात भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते महाराष्ट्र दिनी झाले. उद्घाटनानंतर या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीदेखील या प्रदर्शनास भेट दिली. राज्य शासनाने मागील दोन वर्षात राबविलेले विविध लोकोपयोगी उपक्रम, योजना आदींची सचित्र माहितीचे त्यांनी अवलोकन केले. औरंगाबादेतील माध्यम प्रतिनिधी, महिला, बचत गट, विद्यार्थी, लोकप्र‍तिनिधी यांनीही प्रदर्शनास भेट देऊन समाधान व्यक्त केले. शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळाल्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कौतुकही केले.

कोविड सारख्या जागतिक संकटातही राज्य शासनाने सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून विविध कल्याणकारी निर्णय घेतले. राज्याची आरोग्य यंत्रणा पूर्वीच्या तुलनेत अधिक सक्षम केली. राज्यस्तरावर शासनाचे विविध लोकोपयोगी, निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी या प्रदर्शनातून कळते. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी आणि जालन्यातील महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती या प्रदर्शनात पहावयास मिळते.

परभणी जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत एक लाख 82 हजार कर्ज खातेदारांच्या खात्यात 1138 कोटी शासनाने जमा केले. गेल्यावर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकूण 242 कोटी 25 लाख वितरित केले. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील संशोधनाचा दर्जा अधिक दर्जेदार व्हावा, संशोधन कार्याचा विकास व्हावा, यासाठी 50 कोटींचा निधी, गोवरधन प्रकल्पासाठी जिंतूर तालुक्यातील इटोलीत बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर दळवळण क्षेत्रातील क्रांतीकारी ठरणाऱ्या हिंदू-हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी  महामार्गाला जोडणा-या नांदेड-जालना द्रूतगती महामार्गाचा परभणी जिल्ह्यातील 94 कि.मीचा टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे.

बीडमधील परळी वैजनाथ तीर्थक्षेत्राच्या 132 कोटीच्या विकास आराखड्याच्या कामाला सुरूवात, श्री. क्षेत्र कपीलधार देवस्थानच्या विकासासाठी 100 कोटींचा निधी मंजूर, ऊसतोड कामगारांसाठीच्या संत भगवानबाबा वसतिगृह योजनेतून बीडमध्ये 12 वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. बीडच्या महत्त्वपूर्ण अशा अहमदनगर, बीड, परळी रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या हिश्श्याचे एक हजार 413 कोटी रेल्वे विभागास देण्यात आले.

फळबाग लागवडीत प्रथम असलेल्या जालना जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत वर्षात दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या दीड हजार हेक्टरवर लागवड, अत्याधुनिक अशी शासकीय आरोग्य सुविधा, निजामकालीन शाळांची दुरूस्ती, डिजिटलायजेशन जालन्यात करण्यात येत आहे.

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत उद्योग ‍विकासावर भर, रोजगार निर्मिती, श्री. संत एकनाथ महाराज संतपीठातून संशोधनाला चालना, शहरातील गुंठेवारी नियमित प्रक्रियेस सुरूवात, पर्यटन विकासासाठी एक हजार 704 कोटी रूपयांची तरतूद,   पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकारातून 345 खाटांचे अद्ययावत मेल्ट्रॉन रूग्णालयाची उभारणी, 100 खाटांचे स्त्री रूग्णालय स्थापन करण्यास अर्थसंकल्पात तरतूद, रोजगार हमी योजना अंमलबजावणीत औरंगाबाद राज्यात प्रथम, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या औरंगाबादच्या शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयास शतकोत्तर महोत्सवासाठी दहा कोटींची तरतूद, शिवभोजन योजना प्रभावीपणे राबविण्यात औरंगाबाद आघाडीवर आदी प्रकारची योजना, उपक्रमांची माहिती या प्रदर्शनात सविस्तर पहावयास मिळते.

शासनाने दोन वर्षात घेतलेले महत्त्वपूर्ण राज्याच्या हिताचे निर्णय या प्रदर्शनात पहावयास ‍मिळतात. या प्रदर्शनास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके आदींसह विविध  विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनीही प्रदर्शनास भेट देऊन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या या चित्र प्रदर्शनाबाबत समाधान व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा यांनीही प्रदर्शनाचे कौतुक करताना शासनाच्या विविध निर्णयाचे स्वागत केले. सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यायला हवा, असे आवाहनही प्रदर्शनास भेट दिल्यानंतर त्यांनी केले.     

राज्य शासनाचे सर्व लोककल्याणकारी निर्णय, उपक्रम एकाच छताखाली पहावयास, वाचावयास मिळत असल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, नागरिक, लोक प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या महत्त्वपूर्ण अशा चित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यायलाच हवा. तसेच इतरांनाही सांगायला हवे.
-डॉ. श्याम टरके,

माहिती सहायक,
माहिती केंद्र, औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *