ज्या दिवशी न्यायव्यवस्था यांच्या बुडाखाली जाईल, त्या दिवशी लोकशाहीला श्रध्दांजली वाहावी लागेल

उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर येथील वज्रमूठ जाहीर सभेत मोदी सरकारवर घणाघाती टीका 

छत्रपती संभाजीनगर:  ज्या दिवशी न्यायव्यवस्था यांच्या बुडाखाली जाईल, त्या दिवशी लोकशाहीला श्रध्दांजली वाहावी लागेल, सर्वोच्च न्यायालयातही आमची माणसं घ्या, यासाठी न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात आहे, हे आपण पहात आहोत, अशी जोरदार तोफ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर डागली.

आज रविवारी ते छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत बोलत होते. उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर येथील नुकत्याच झालेल्या दंगलीच्या संदर्भाने म्हणाले की, निवडणुका आल्या की, जातीय तेढ निर्माण केली जाते. जगातील सर्वात मोठे व शक्तीशाली असे पंतप्रधान हिंदू असताना हिंदुंना आक्रोश मोर्चा काढावा लागतो. असे ते पंतप्रधान मोदींचे नाव न घेता म्हणाले. आम्ही काँग्रेस सोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलं असं होत नाही, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. आम्ही सत्तेसाठी काँग्रेससोबत गेलो म्हणून अमित शहा पुण्यात म्हणाले होते की, तुम्ही सत्तेसाठी काँग्रेसचे तळवे चाटले, मग जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही महेबूबा मुफ्तीसोबत गेला तेव्हा काय चाटत होता, महाराष्ट्रात गद्दारी करून सरकार स्थापन केलंत तेव्हा मिंदेचं काय चाटत होतात. तिकडे बिहारमध्ये नितीशकुमारांसोबत सरकार स्थापन केलंत तेव्हा काय चाटत होता, संगमांचं काय चाटत होता, असे प्रश्न उपस्थित करून अमित शहांवर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही पक्ष चोरलात, चिन्ह चोरलंत, आता माझे वडीलही चोरायला निघालात. तुमच्यात हिंम्मत असेल तर तुम्ही मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मतं मागायला या, मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन येतो, असे सांगून त्यांनी भाजपला आव्हान दिले. खासदार सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे शिंदे गटाचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार व आमदार संजय सिरसाट यांच्यावरही नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी टीका केली. तसेच कांद्याच्या भावाचा संदर्भ देत, कांद्याला भाव नाही असे कसे म्हणता येईल, एक कांदा पन्नास खोक्याला विकला गेला, असे सांगून शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांचे नाव न घेता त्यांच्यावरही तोफ डागली. 

हिंडेनबर्ग अहवाल, राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करणे, ईडीच्या आडून माजीमंत्री अनिल देशमुख यांच्या लहानग्या नातीची चौकशी करणे, लालूप्रसाद यादव यांची गर्भवती सून बेशुद्ध पडेपर्यंत चौकशी करणे, हे कुठल्या हिंदुत्वात बसते, असा प्रश्न उपस्थितांना विचारून भाजप व शिंदे सरकारला धडा शिकवण्याचे आवाहन केले. तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन मिंद्याचं ओझं घेऊन तुम्ही महाराष्ट्रात निवडणुका लढवणार आहात, का असा सवाल भाजपला विचारला. मी मोठी केलेली माणसं मला सोडून गेली पण मोठी करणारी माणसं माझ्यासोबत आहेत, असे उपस्थितांना उद्देशून सांगितले.

यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजीमंत्री धनंजय मुंडे, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचीही भाषणे झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *