# बिकानेरचा पापड खाल्ल्याने कोरोना बरा होतो सांगणारे केंद्रीय मंत्रीच कोरोना पॉझिटिव्ह.

नवी दिल्ली: बिकानेरचा पापड खाल्ल्यामुळे कोरोनापासून बचाव होतो, असा दावा करणारे केंद्रीय राज्य मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

मेघवाल यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यामुळे मी कोरोना चाचणी केली. पहिली चाचणी निगेटिव्ह आली होती. आज दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, असे ट्विट मेघवाल यांनी शनिवारी केले. आपली प्रकृती ठिक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण एम्समध्ये भरती आहोत. गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असे मेघवाल यांनी म्हटले आहे.

मेघवाल हे राजस्थानमधील बिकानेरचे भाजप खासदार असून ते संसदीय कामकाज व केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री आहेत. जुलै महिन्यात मेघवाल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात ते एका पापडाच्या ब्रँडचा प्रचार करताना हे पापड खाल्ल्याने कोरोनापासून बचाव होतो, असे सांगताना दिसत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती.

आत्मनिर्भर भारत अंतर्गत एका पापड निर्मात्याने एक असा ब्रांड काढला आहे की, कोरोना विषाणूशी लढण्यासाठी ज्या अन्टिबॉडीज विकसित होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, त्या हे पापड खाल्ल्यामुळे शरीरात जातात. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत हे पापड उपयुक्त ठरेल, असे मेघवाल या व्हिडीओत सांगत होते. आता तेच कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *