औरंगाबाद: शाश्वत विकास ही केवळ अर्थशास्त्रापुरती मर्यादित संकल्पना नव्हे तर मनुष्याच्या सर्वांगिण विकासासाठीच्या सर्वच क्षेत्रांचा समावेश त्यात होतो. मराठवाड्याच्या शाश्वत विकासासाठी चारही विद्यापीठांनी एकत्रित येऊन किमान समान कार्यक्रम प्रभावीपणे राबविला पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले.
‘महात्मा गांधी मिशन‘च्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त मराठवाड्यातील कुलगुरुंची परिषद शनिवारी (दि.१९) घेण्यात आली. ‘मराठवाड्याच्या शाश्वत विकासात विद्यापीठांची भूमिका‘ या विषयावर परिषदेत तीन तास मंथन झाले. ‘एमजीएम‘चे संस्थापक, माजी मंत्री कमलकिशोर कदम अध्यक्षस्थानी होते. परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्यासह वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.अशोक ढवण, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उध्दव भोसले, ‘एमजीएम‘विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे, प्राचार्य डॉ.प्रताप बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम व उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले.
परिषदेच्या आयोजनामागची भूमिका डॉ.सुधीर गव्हाणे यांनी विशद केली. ते म्हणाले, विदर्भ, मराठवाडा यासारख्या भागात आज दळवणवळण व तंत्रज्ञानापमुळे मोठे बदल झाले आहेत. मात्र, त्याचे एकत्रित प्रकटीकरण होत नाही. या भागात दर्जेदार संशोधक, उद्योजक व शिक्षणतज्ज्ञ आहेत. या सर्वांना एकत्रित आणून सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने हे विद्यापीठांनी पहिले, आश्वासक पाऊल टाकलेले आहे. ही सुरुवात अत्यंत सकारात्मक व आशादायक आहे, असेही डॉ.गव्हाणे म्हणाले.
परिषदेत पहिले भाषण डॉ.प्रमोद येवले यांचे झाले. ते म्हणाले, ‘एमजीएम‘ने मराठवाड्यातील सर्व विद्यापीठांना पहिल्यांदाच एका प्लॅटफॉर्मवर आणले आहे. जागतिकीकरणामुळे जग ‘वैश्विक खेडे‘ बनले आहे. अशा काळात विकासासाठी शैक्षणिक संस्था, उद्योजक व समाज यांची सांगड घालणे गरजेचे आहे. ज्ञान हेच आज भांडवल बनले असून गुणवत्ता, दर्जेदार संशोधन व नवोन्मेष या त्रिसूत्रीच्या बळावर कार्य करणे गरजेचे आहे. आज काल कौशल्यावर आधारित ज्ञान व उद्योग सुरु होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आपल्या विद्यापीठाने काम सुरु केले आहे, असेही डॉ.येवले म्हणाले. डॉ.बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठ ही मराठवाड्यातील सर्व महाविद्यालये व विद्यापीठांची मातृसंस्था असून या कामी आम्ही पुढाकार घेऊ, असेही डॉ.येवले म्हणाले. शिक्षण आणि नोकरी एवढा मर्यादित विचार न करता रोजागाराभिमुख ज्ञान व कौशल्य प्राप्ती यादृष्टीने शिक्षणाकडे बघावे, असे कुलगुरु डॉ.उध्दव भोसले म्हणाले. कृषी विकासातील योगदानासोबत ग्रामीण विकासात कृषी विद्यापीठाने योगदान दिल्याचे कुलगुरु डॉ.अशोक ढवण म्हणाले.
अशा परिषदांसह सर्व विद्यापीठांमध्ये ज्ञान, संशोधनाचे आदान-प्रदान व्हावे, अशी भूमिका सर्वच कुलगुरुंनी व्यक्त केली. महात्मा गांधी मिशन ही केवळ एक संस्था नव्हे तर मराठवाड्याच्या शिक्षणने राष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग करण्याची एक संस्था ठरली आहे, असे माजी मंत्री कमलकिशोर कदम म्हणाले. यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यासारख्या दृष्ट्या नेत्यांमुळे बहुजन समाजातील मुले शिकू शकली पवार साहेबांमुळे हे विद्यापीठ निर्माण झाले, असेही ते म्हणाले.
यावेळी अर्थतज्ज्ञ डॉ.एच.एम.देसरडा यांनीही मनोगत व्यक्त केले. सुमारे तीन तास झालेली ही परिषद प्रत्यक्ष रुक्मिणी सभागृह झुम मिट व फेसबुक लाईव्ह अशा तीनही प्रकारे उपलब्ध करुन देण्यात आली. देवाशिष शेडगे यांनी सूत्रसंचालन तर उपकुलसचिव प्रेरणा दळवी यांनी आभार मानले.