मुंबई: राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे परिपत्रक राज्य सरकारने आज जारी केले आहे. मिशन बिगीन अगेनच्या पहिल्या टप्प्यात ज्या अटी शर्थी होत्या त्या कायम ठेवण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक दुकाने आणि आँड इव्हन नियमानुसारची नियमावली कायम राहणार आहे. सरकारी आणि खाजगी कार्यालयांची नियमावलीही कायम राहणार आहे. राज्यात 31 जुलैपर्यंत जिल्हाबंदी कायम असेल, एसटी बससेवाही बंद असेल. बिगीन अगेन नुसार दिलेल्या सवलतींनाच मुदतवाढ असेल, असेही या पत्रकात म्हटले आहे.
राज्यातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत होता. मात्र, त्यापुढे काय अशी उत्सुकता राज्यातील नागरिकांना लागली होती. राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक होत आहे. मात्र, अद्याप जिल्हाबंदी कायम राहणार आहे. एसटी बससेवाही बंदच राहणार आहे. विशेष म्हणजे काल रविवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावरून संवाद साधताना 30 जूननंतरही लॉकडाऊन उठणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे जुलैनंतर लॉकडाऊन उठेल व गावाकडे जाता येईल, या आशेवर बसलेल्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे आता किमान 31 जुलैपर्यंत पुन्हा आहे, त्याच रूटीननुसार सर्व कामकाज करावे लागणार आहे. अत्यावश्यक सेवेतील तसेच कार्यालयात जाणाऱ्यांनाच दूरचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटमध्येच जाता येईल, दूर जाता येणार नाही. राज्यात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह आकडेवारीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.