हातकागद संस्थेची उत्पादने शासकीय कार्यालयात वापरणार -उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेच्या व्यावसायिक संकेतस्थळाचे अनावरण उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. पुढील काही दिवसांत हातकागद संस्थेची उत्पादने शासकीय कार्यालयात वापरणार असल्याचे श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेच्यावतीने पर्यावरणपूरक हातकागदाची निर्मिती केली जाते. १९४० पासून ही संस्था हातकागद उत्पादनात अग्रेसर आहे. या संस्थेच्या उत्पादनांना चांगली मागणी आहे. ही सर्व उत्पादने आता ऑनलाईन उपलब्ध झाल्याने संस्था मोठ्या प्रमाणत लोकांपर्यत पोहोचेल, असा विश्वास श्री.देसाई यांनी व्यक्त केला.
हातकागद संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकाराचे कागद, फाईल्स, पॅड कव्हर, डायरी, दिनदर्शिका, तयार केले जातात. या सर्व उत्पादनांना लोकांची मागणी वाढत आहे. याबाबत मंडळाने व्यावसायिक स्वरुपात www.punehandmadepapers.com हे संकेतस्थळ विकसित केले आहे.
या कार्यक्रमास उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. नीलिमा केरकेट्टा, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी, अन्बलगन आदी उपस्थित होते.