नांदेड: महाराष्ट्र दिनाच्या हिरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ चे सर्व नियम पाळून मराठवाड्यातील दिग्गज कलावंतांनी सोशल मीडिया, फेसबुकवर महाराष्ट्राच्या लोकपरंपरेची ओळख करुन देणारा ही मायभूमी, महाराष्ट्र भूमी हा गीत संगीत नृत्याचा विशेष कार्यक्रम सादर केला. प्रख्यात गायक रविंद्र खोमणे यांचे संगीत, दिग्दर्शन आणि प्रख्यात निवेदक महेश अचिंतलवार यांचे दर्जेदार निवेदन यामुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगला.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरीच रहा, सुरक्षित रहा, असा संदेश राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्यानंतर कोविड-१९ चे सर्व नियम पाळून संस्कृती मंच महाराष्ट्रने निर्मिती केलेला व विजय जोशी यांनी दिग्दर्शित केलेला ही मायभूमी, महाराष्ट्र भूमी हा महाराष्ट्रातील लोककला, लोकसंगीत व लोकनृत्यांची ओळख असणारा कार्यक्रम फेसबुकवर सादर केला.
कार्यक्रमाची सुरुवात रविंद्र खोमणे आणि विजय जोशी यांच्या नटरंग उभा या गाण्याने झाली. त्यानंतर जोत्सना स्वामी निलावार यांनी घागर घेवून घागर घेवून ही गवळण सादर केली. महाराष्ट्राचा प्रख्यात गायक रविंद्र खोमणे यांनी माझे माहेर पंढरी हे भक्तीगीत तसेच लख्ख पडला प्रकाश हा गोंधळ तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठबळ देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे माझी मैना गावाकडं राहिली हे लोकगीत तसेच फु बाई फु, फुगडी फु, हे भारुड सादर केले. जोत्सना स्वामी निलावार या गायिकेने तुम्हावर केली मी मर्जी बहाल ही लावणी, अरे खोप्यामंधी खोपा ही ओवी आणि मराठमोळं गाणं तसेच गुणी बाळ असा हे अंगाई गीत अशी दर्जेदार लोकगीते सादर केली. त्यानंतर विपूल जोशी यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ही मायभूमी ही जन्मभूमी हे गीत सादर करुन महाराष्ट्राच्या मातीला सलाम केला. त्यानंतर कोरोना युध्दाच्या काळात संघर्ष करत गेली अनेक वर्ष काम करीत असलेल्या कोरोना यौध्दांसाठी प्रार्थना करत महाराष्ट्र लवकर कोरोना मुक्त होवो दे, ही प्रार्थना करुन परमेश्वराला आर्जव केला. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे हे गीत सादर करुन फेसबुकच्या सर्व श्रोत्यांना वेगळ्या विश्वात नेले.
कार्यक्रमाचा समारोप रविंद्र खोमणे आणि विजय जोशी आणि संचाच्या मराठी पाऊल पडते पुढे या गिताने झाला. दीपक अंभोरे आणि त्यांच्या संचाने वाघ्या मुरळी आणि जरीच्या चोळीला या लोकगीतावर आधारीत नृत्य सादर करुन महाराष्ट्राच्या परंपरेची आगळी वेगळी ओळख करुन दिली. शाहीर किशोर धारासूरे आणि संच यांनी पोवाडा सादर केला. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या सूत्रसंचलनात नावारुपास आलेले प्रख्यात निवेदक महेश अचिंतलवार यांच्या नेटक्या निवेदनाने या कार्यक्रमात रंगत आणली.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन करत असताना ई टिव्ही, गौरव महाराष्ट्राचा संगीत सम्राट महासंग्रामचा विजेता आणि सूर नवा आणि ध्यास नवाचा उपविजेता रविंद्र खोमणे यांनी संगीत दिग्दर्शनाची बाजू चोखपणे बजावली. या कार्यक्रमाला संगीतसाथ ढोलक आणि ढोलकीवर जितेंद्र साळवी, अॅक्टोपॅडवर विनोद वाव्हळ, सिथेंसायझरवर अमर वानखेडे, तबल्यावर जगदीश व्यवहारे यांनी साथ केली. या कार्यक्रमाचे ध्वनी अभियंता म्हणून ऋषिकेश धर्माधिकारी आणि व्हिडीओ आणि एडीटींगचे काम उमेश कुलकर्णी या दोघांनी उत्कृष्टपणे सांभाळले. संभाजीनगर च्या एएमडी रेकॉर्डींग स्टुडिओ आणि नांदेडच्या स्टुडिओमधून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. महाराष्ट्रातील एकमेव अशा या कार्यक्रमाला फेसबुकवर रसिक, प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.