# सोन्याचा मोह न बाळगता भाजी विक्रेत्या महिलेने सापडलेली अंगठी केली परत.

 

कंधार (जि.नांदेड): कंधार येथील महाराणा प्रताप चौकात आंबे विकणाऱ्या निर्मलाबाई कांबळे या भाजी विक्रेत्या महिलेस सापडलेली एक तोळ्याची सुमारे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी तत्काळ परत करून दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कंधार शहरातील रमाईनगर येथे राहणारे त्र्यंबक कांबळे व निर्मलाबाई कांबळे हे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला आणि आंबे विक्रीचे काम मोठ्या कष्टाने गेल्या २५ वर्षांपासून प्रामाणिकपणे करत आहेत. नेहमीप्रमाणे २१ जून रोजी म्हणजे अंतरराष्ट्रीय योगदिनी ते शहरातील महाराणा प्रताप चौकात गजबजलेल्या ठिकाणी आंबे विकत होते. त्यावेळी त्यांच्याकडे चोंडी (ता.लोहा) येथील शिल्पकार सुधाकर ढवळे हे लाठी(खु.) येथे आपल्या मेव्हण्याच्या शाल-अंगठीच्या कार्यक्रमासाठी जात होते. कार्यक्रमाला जाताना आंबे घेऊन जावे म्हणून त्यांनी २१ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास महाराणा प्रताप चौक येथे त्यांनी आंब्याची खरेदी केली. त्यानंतर ते दुचाकीवरून लाठी (खुर्द) कडे निघाले. परंतु खिशातील रुमाल काढताना महाराणा प्रताप चौकात दोन अंगठ्या पैकी एक अंगठी गहाळ झाली. काही वेळानंतर निर्मलाबाई कांबळे यांना रस्त्यावर एक सोन्याची अंगठी सापडली. ही अंगठी ५० हजार रुपये किंमतीची आहे. एक अंगठी गहाळ झाल्याचा प्रकार सुधाकर ढवळे यांना अर्ध्या तासानंतर लक्षात आला. त्यानंतर त्यांनी अंगठीची शोधाशोध सुरू केली. निर्मलाबाई कांबळे यांना एक मुलगा काहीतरी शोधत असल्याचे लक्षात आले. काय शोधत आहेस? असे त्या मुलास विचारले. त्या मुलाने अंगठी हरवली असल्याचे सांगितले. त्यानंतर निर्मलाबाई कांबळे यांनी क्षणाचाही विलंब न करता अंगठी मला सापडली असून ती माझ्याकडे आहे. काळजी करू नका असे म्हणत आपुलकीने सांगितले व अंगठी परत करून त्यांना दिलासा दिला.  सोमवार, २२ जून रोजी दुपारी २ च्या सुमारास सुधाकर ढवळे यांनी निर्मलाबाई कांबळे यांची सपत्नीक भेट घेऊन कपडेरुपी भेट दिली. यावेळी त्र्यंबक कांबळे, सचिन कांबळे, वैजनाथ गिरी, भारतबाई वाघमारे, पूजा ढवळे आदींची उपस्थिती होती.

निर्मलाबाई यांच्या प्रामाणिकपणाला सलाम:  घरची परिस्थिती सर्वसामान्य ५ माणसाचे कुटुंब जगवताना निर्मलाबाई व त्र्यंबक कांबळे या दाम्पत्यास गेल्या अनेक वर्षापासून भाजीपाला विकणे, आंबे विकणे व मिळेल ती कामे करत त्यांनी आपला संसार मोठ्या नेटाने चालवला. त्यांची दोन्ही मुले उच्च विद्याविभूषित असून त्यांना घडविण्यासाठी कांबळे पती-पत्नींनी आपले आयुष्य पणाला लावले. घरची परिस्थिती सर्वसामान्य असून सोन्याच्या अंगठीचा मोह न बाळगता ती वस्तू प्रामाणिकपणे परत करण्याचा मनाचा मोठेपणा दाखवल्यामुळे कांबळे परिवार हा कौतुकाचा विषय ठरला आहे. दरम्यान, पत्रकार सचिन मोरे यांनीही कांबळे दाम्पत्याचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी पत्रकार विनोद तोरणे, राजेश्वर कांबळे, शेख शादुल, रुपेश कांबळे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *