नांदेड: प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 30 एप्रिल 2023 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 30 एप्रिल 2023 या दिवसासाठी ऑरेंज अलर्ट व दिनांक 1,2,3 व 4 मे 2023 चार दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील परभणीसह हिंगोली जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.
दिनांक 30 एप्रिल या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच 1,2,3 व 4 मे 2023 या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
वादळी वाऱ्यामुळे विद्युत पोल, झाडे उखडली, घराचे पत्रे देखील उडाले:
बिलोली: नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहर व परिसरात रविवारी दुपारी चक्रीवादळ मुसळधार पावसामुळे अनेक झाडे बुडातुन तुटून पडले तर अनेक घरांचे पत्रे उडाले , विजेचे खांब देखील आडवे पडले विजांचा कडकडाट सह जोरदार अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. यावेळी शहरातील शाळेच्या खोलीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. शहरात दोन ठिकाणी विजेचे खांब वाकले दुपार पासून शहरातील वीज पुरवठा खंडित झाला असून १३ खांब व १८ ठिकाणी तार तुटले आहे.