पुणे: खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वतीने दुसऱ्या उन्हाळी आवर्तना अंतर्गत आज शनिवारपासून साडेतीन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्यात येणार आहे. मुठा उजवा कालव्यातून पुढील 37 दिवस हे आवर्तन सुरू राहील. गेल्या वर्षी पुणे विभागामध्ये जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे खडकवासला विभागातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवसला ही धरणे तुडुंब भरली होती. आजही या चारही धरणात मिळून 8.38 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यानुसार पुणे शहराला जुलैअखेरीस पिण्यासाठी लागणारे पाणी गृहीत धरून उन्हाळी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे.
महापालिकेला 15 जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी 2.81 टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. पाऊस लांबल्यास आपत्कालीन स्थतीत शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 0.66 टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे. जनाई शिरसाई योजनेसाठी 0.30 आणि दौंड नगरपालिका योजनेसाठी 0.23 टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर चारही धरणांचे मिळून 0.82 टीएमसी बाष्पीभवन गृहित धरण्यात आले आहे.
उन्हाळी आवर्तनासाठी 23 मे ते 28 जून या कालावधीमध्ये साडेतीन टीएमसी पाणी सोडण्यात येईल. इंदापूर उपविभागासाठी 23 मे ते 7 जून, दौंड उपविभाग एक अंतर्गत 7 ते 17 जून आणि दौंड उपविभाग दोन अंतर्गत पाटस आणि यवत पाटबंधारेसाठी 18 ते 28 जून दरम्यान पाणी सोडण्यात येईल, असे खडकवासला पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.