नवी दिल्ली: केंद्र सरकारने विविध समाज माध्यम मंचाचा वापर करणाऱ्या सामान्य जनांच्या डिजिटल माध्यमांवर प्रकाशित साहित्यविषयक तक्रारींचे निवारण करणे तसेच त्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करणे शक्य व्हावे यासाठी 25 फेब्रुवारी 2021 पासून नवे माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि माध्यमांसाठी आचार संहिता) नियम 2021 अधिसूचित केले आहेत.
आचारसंहिता आणि डिजिटल माध्यमांशी संबंधित प्रक्रिया आणि सुरक्षा यंत्रणा यांच्याशी संबंधित असलेला नियमांचा तिसरा भाग केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत लागू केला जात आहे. या संदर्भात, पत्र सूचना कार्यालयाने डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेची अंमलबजावणी आणि त्यासंदर्भातील तर्कसंगत विचार याबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण देण्यासाठी सोमवार, 12 जुलै 2021 रोजी दुपारी 3 वाजता एक वेबिनार आयोजित केला आहे.
या वेबिनारमध्ये मुख्य वक्ते म्हणून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सह-सचिव विक्रम सहाय मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मुख्य वक्त्यांच्या मार्गदर्शनानंतर प्रश्नोत्तर सत्र होणार आहे. हा वेबिनार सर्व डिजिटल वृत्त माध्यमांसाठी तसेच डिजिटल आशय/ सामग्री निर्मितीशी संबंधित व्यक्तींसाठी उपयुक्त राहील.
या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी https://forms.gle/T29k1b2UARvoJxaA9 या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी खालील तपशील pibmumbai@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवावा.
1. नाव
2. संस्था
3. पदनाम
4. मोबाईल / दूरध्वनी क्रमांक
5. ईमेल
अधिक माहितीसाठी सुनंदा भालचीम (मोबाईल: 9967268257) किंवा चंद्रशेखर यादव (मोबाईल: 9340448305) यांच्याशी संपर्क करावा, असे पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.