ईडीच्या समन्सनंतर काय म्हणाले हेमंत सोरेन..

रांची: सक्तवसुली संचालनालयाने (ED) साहिबगंज जिल्ह्यातील अवैध खाणकाम प्रकरणात समन्स बजावल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “जर मी दोषी आहे, तर तुम्ही मला प्रश्न का विचारत आहात? या आणि अटक करा” असं थेट आव्हान त्यांनी तपास यंत्रणांना दिलं आहे. ईडीने पाठवलेला समन्स एका आदिवासी मुख्यमंत्र्याला त्रास देण्याच्या कटाचा एक भाग आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. या कटाला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

“सत्ताधारी भाजपाला विरोध करणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्यासाठी घटनात्मक संस्थांचा गैरवापर केला जात आहे”, असा हल्लाबोल सोरेन यांनी केला आहे. ईडीच्या रांची स्थित विभागीय कार्यालयात आज सोरेन यांची चौकशी होणार होती. या चौकशीला गैरहजर राहून त्यांनी ‘झारखंड मुक्ती मोर्चा’च्या एका सभेला संबोधित केले. “मला त्रास देण्याच्या प्रयत्नामागे आदिवासी, मागास आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांवर गदा आणणे हा उद्देश आहे. आमच्या पूर्वजांनी आम्हाला हरायला शिकवलं नाही. त्यांनी आम्हाला लढायला आणि जिंकायला शिकवलं”, असे सोरेन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अवैध खाणकाम प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे सहकारी पंकज मिश्रा यांना याआधीच ईडीने अटक केली आहे. जुलैमध्ये केलेल्या छापेमारीनंतर मिश्रा यांच्या खात्यातून ११ कोटी ८८ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली होती. मिश्रा यांच्या निवासस्थानातून पाच कोटी ३४ लाखांची बेहिशेबी मालमत्ताही या तपास यंत्रणेनं जप्त केली होती. याशिवाय तीन महिन्यांआधी सोरेन यांचे माध्यम सल्लागार अभिषेक प्रसाद यांचीही ईडीनं चौकशी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *