पुणे: कोरोना काळात पूर्वप्राथमिकच्या ऑनलाइन शिक्षणामध्ये शिक्षक, पालकांकडून व्हॉट्सअॅपचा वापर सर्वाधिक झाला. ऑनलाइन शिक्षणासाठी व्हॉट्सअॅपचा वापर ८६ टक्के आणि अन्य ऑनलाइन मंचांचा वापर ५६ टक्के झाल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी यांच्यातर्फे ‘स्टार्टिंट फ्रॉम द स्क्रॅच: द रोल ऑफ पेरेंट्स, टीचर्स अँड द टेक इन अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन ड्युरिंग कोविड १९’ हा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अहवालात कोरोना काळातील पूर्वप्राथमिक शिक्षणासंदर्भातील अभ्यास करण्यात आला. त्यासाठी एप्रिल ते जून या कालावधीत मुंबई, पुण्यातील अल्प उत्पन्न गटातील ६७६ कुटुंबे, ५८ शिक्षकांशी संवाद साधण्यात आला.
ऑनलाइन वर्गासाठी आवश्यक इंटरनेट सुविधा आणि स्मार्टफोन नसल्याने नियमित शाळेत जाणाऱ्या विद्याथ्र्यांची ऑनलाइन वर्गातील उपस्थिती ४० टक्केच होती. पालकांना अन्य कामे असल्याने त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी वेळ देणे शक्य नव्हते. बालवाडी, शाळा बंद असल्याने पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी पालकांना खर्च करावा लागला. सर्वेक्षणात सहभागी पालकांपैकी केवळ २४ टक्के पालक स्मार्टफोन किंवा तत्सम साधन खरेदी करू शकले. ३८ टक्के पालक शैक्षणिक साहित्य विकत घेऊ शकले. तर अध्ययन-अध्यापन साहित्यावर आठवड्याला शंभर रुपये खर्च होत असल्याचे पालकांनी नमूद केले.
ऑनलाइन शिक्षणासाठी तीन मुलांना दोन स्मार्टफोन वापरावे लागत होते. ५० टक्के कुटुंबांत मुलांपेक्षा स्मार्टफोनची उपलब्धता कमी होती. तर ४५ टक्के कुटुंबांमध्ये पूर्वप्राथमिकमधील मुलापेक्षा वरच्या वर्गातील मुलांनी शिक्षणासाठी स्मार्टफोन वापरण्याला प्राधान्य देण्यात आले. अनेक मूलभूत संकल्पना शिकवण्यात मर्यादा येत असल्याने ऑनलाइन शिक्षण तितकेसे प्रभावी नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. मुलाच्या पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी पालकांकडे वेळ, पैसा, साधने नसल्याचे निरीक्षण शिक्षकांनी नोंदवले.