नरसी फाटा (ता.नायगाव) येथे शनिवार, 5 नोव्हेंबर रोजी 17 वे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे. या निमित्त संमेलनाध्यक्षा डॉ. संजीवनी तडेगावकर यांचे अध्यक्षीय भाषण देत आहोत.
नरसी येथे होत असलेल्या 17 व्या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटक मा. राजेश देशमुख कुंटूरकर, स्वागताध्यक्ष मा. प्रकाशदादा भिलवंडे, या संमेलनाचे पूर्वाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंत आदरणीय प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर, हे संमेलन जीवापाड निष्ठेने आयोजित करणारे मुख्य संयोजक ज्येष्ठ कथाकार मा. दिगंबर कदम, त्यांच्या हाकेला तितक्याच तत्परतेने ‘ओ’ देणारे त्यांचे आणि माझेही जीवलग स्नेही ज्येष्ठ साहित्यिक मा. देविदास फुलारी, मा. नारायण शिंदे, प्रा. धाराशिव शिराळे, अॅड. एल.जी. पुथड, सर्व पदाधिकारी व या संमेलनासाठी आवर्जुन उपस्थित कवी, समीक्षक, साहित्यिक, पत्रकार, वाचक, रसिक मित्र-मैत्रिणींनो!
असे म्हणतात की, जेव्हा वाणी मौन पाळते, तेव्हा मन बोलायला लागते, जेव्हा मन मौन धारण करते तेव्हा बुद्धी बोलू लागते आणि जेव्हा बुद्धी मौन पाळते तेव्हा आत्मा बोलू लागतो. आत्म्याने मौन धारण केले की ‘स्व’शी संवाद होऊ लागतो. नेहमी असा ‘स्व’ सोबत चालणारा माझा संवाद आज मी इथे तुमच्याशी करू इच्छिते!
मी स्वत:ला आज खूप भाग्यवान समजते. कारण ज्या प्रतिष्ठेच्या जागेवरून मला आज बोलायला मिळत आहे, त्या जागेला प्रतिष्ठा मिळवून देणारे माझ्या आधीचे सर्व सन्माननीय संमेलनाध्यक्ष खूप मान्यवर आहेत. पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मराठीतील महत्त्वाचे कवी आदरणीय विठ्ठल वाघ यांनी या संमेलनात पहिल्यांदा विचारांची पेरणी केली होती. त्यानंतरच्या प्रत्येक वर्षीच्या अध्यक्षांनी ही ‘लोकसंवाद’ची भुई आपापल्या परीने मशागत करून कसदार केली आहे आणि त्याने आता ऐन तारुण्यात पदार्पण करताना मी आपल्यासमोर उभी आहे. त्या अर्थाने मी खरेच खूप नशीबवान आहे. त्यामुळे दिगंबर कदम यांचे सुरुवातीलाच खूप आभार!
मित्रहो! हे संमेलन जाणीवपूर्वक ग्रामीण भागात भरवले जात आहे. यामागे संयोजकांचा काही एक दृष्टिकोन आहे. अर्थपूर्ण भूमिका आहे. तसेच संमेलनाच्या अध्यक्षाची निवड करताना दाखवलेला चोखंदळपणा कुणाच्याच नजरेतून सुटणारा नाही. ही सगळीच मंडळी ग्रामीण जीवन-जाणिवा उरीपोटी घेऊन जगणारी आणि त्याबद्दल तळमळीने बोलणारी-लिहिणारी आहेत. त्यामुळे संयोजकांच्या हरहुन्नरी चोखंदळ नजरेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़े इथे नोंदवणो गरजेचे आहे. ते म्हणजे मराठी साहित्याला समृद्ध करण्यामध्ये स्त्री साहित्याचे फार मोठे योगदान असून विविध वा्मय प्रकारांमध्ये स्त्रियांनी कसदार आणि उदंड लिहिले आहे. हे असे असतानाही त्यांची नोंद म्हणावी तशी घेतली जात नाही, हे दुर्दैव आहे. 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपण नुकतेच उदगीर येथे घेतले. आतापर्यंत 95 वर्षात कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष व अरुणा ढेरे या फक्त पाच लेखिका अध्यक्ष होऊ शकल्या. आणि लोकसंवादचे हे 17 वे साहित्य संमेलन आहे. तर इथे या संमेलनात प्रतिमा इंगोले, वृषाली किन्हाळकर, ललिता गादगे व संजीवनी तडेगावकर या चार लेखिका सन्मानपूर्वक अध्यक्ष झालेल्या आहेत. त्यामुळे असे म्हणायला हरकत नाही की, अखिल भारतीय महामंडळाला जे जमले नाही ते लोकसंवादने करून दाखवले. खऱ्या अर्थाने सर्वाना न्याय देणारे, स्त्री-पुरुष समानता जोपासणारे हे संमेलन आहे, याचा विशेष आनंद आहेच.
माझे आयुष्य ग्रामीण आणि नागरी अशा दोन कप्प्यात विभागले गेले. शेतकऱ्याची मुलगी असल्याने शेतीनिष्ठ अनुभवाच्या जीवनरसावरच माझ्या स्वभावाचा पिंड पोसला आहे. पुढे शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने जरी मी शहरात आले तरी अजूनही गाव माझ्या आत वस्तीला आहे. मला गावाकडच्या माती-माणसांची ओढ आहे. गावच्या अभावग्रस्त परिसरात जगण्याला चिकटून असलेली चिवट माणसे माझ्या श्रद्धेचा आणि चिंतनाचा विषय आहे. जीवघेण्या संघर्षाच्या पडझडीत हिमतीने पाय रोवून उभी राहणारी करारी माणसे मला नेटाने भूमिकेवर ठाम राहण्याची उब पुरवतात. जिव्हाळ्याच्या गणगोतासाठी झिजणारी, दिल्या-घेतल्या शब्दासाठी जागणारी, खेड्यातील जुनी माणसे, हळवी, भाबडी, लोण्यावानी मऊ माणसे मला चांगुलपणावर प्रेम करायला शिकवतात. कुत्सित, हेकेखोर, भांडकुदळ, दुष्ट, सापासारखी विषारी माणसे गावात नसतात, असे नाही. पण त्यांचे असणे तुलनेने कमी आणि दीनदुबळ्या, पीडित, शोषित, दु:खी-कष्टी जीवांना, प्राणी, पशू-पक्ष्यांना ‘या रे या रे सकल जन’ म्हणत मायेने पोटाशी धरणारा आबादी आबाद गाव मी पाहिला आहे. तेथील आनंद, दु:ख, वेदना, जल्लोष हे सगळे अनुभवत तृप्त समाधानाची साय मनावर पांघरून मी लहानाची मोठी झाले. रात्रीच्या शांत वेळी मंदिरातून गायल्या जाणाऱ्या भजनातील आर्त व्याकुळता आत कुठे तरी घर करून राहिली. तिथल्या निसर्गाने, लोकसंस्कृतीने, लोकलयीने माझ्या सृजनशील मनावर असे काही गारूड केले की त्याची झिंग अजूनही माझ्या लेखनीतून पाझरतेच आहे.
लहानपणी दर रविवारी मी शेतात जायची. मला गाणी ऐकायची आणि म्हणायची फार आवड होती. त्यासाठी मी वयाच्या दहा-अकराव्या वर्षापासूनच मंदिरात होणाऱ्या भजनाच्या कार्यक्रमात जात असे. तिथे वेगवेगळ्या अभंगांना आणि गवळणींना चाली लावून म्हणत असे. सगळे जण माझे खूप कौतुक करीत. मला भारी वाटे. नवनवी भजने म्हणायला प्रोत्साहन मिळे. धाकट्या मामाच्या लग्नात त्यांना एक रेडिओ मिळाला होता. तो ते गावीच ठेवून गेले होते. त्या काळात मी त्या रेडिओचा पुरेपूर वापर करत असे. खूप गाणी, मुलाखती, बातम्या सगळे सगळे ऐकत राहायचे. रेडिओवर निवेदन करणाराचे आणि बातम्या सांगणाराचे मला खूप अप्रूप वाटायचे. त्यांची लडीवाळ भाषा, बोलण्यातली सहजता, मधाळ-गोड आवाज, भाषेवरचे प्रभुत्व यामुळे मी खूप भारावून जात असे. कारण माझ्या आजूबाजूला जे आणि जसे बोलले जायचे ते फारच रांगडे आणि राकट असे होते. समोरचा व्यक्ती आपल्याशी प्रेमाने बोलतोय की रागाने हेच कळत नसे. इतके ते सगळे आरडून-ओरडून असे. मी बीड जिल्ह्याची, त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता! भाषेच्या आणि माणसांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची.. तर मला रेडिओ एका वेगळ्या न पाहिलेल्या अशा सुंदर भावविश्वात घेऊन जायचा. आणि त्यामुळे मला जास्तीत जास्त त्याचा लळा लागला. मी तिकडेच लता-आशा मंगेशकरांचा गोड आवाज ऐकला. महानोरांच्या, खेबुडकरांच्या, नामदेव ढसाळांच्या, शांताबाईंच्या, इंदिरा संतांच्या कविता, गाणी ऐकली. आर्त स्वर, भावपूर्ण शब्द आणि मोहून टाकणाऱ्या अप्रतिम चाली ऐकल्या. त्या काळात मी सतत रेडिओ सोबत ठेवत असे. अगदी रविवारी शेतात जातानाही त्याला सोबत नेत असे. शेतातल्या घराच्या अंगणात बाभळीच्या झाडाला नाही तर उभ्या असणाऱ्या बैलगाडीच्या साठ्याला अडकवून दिवसभर मोठ्या आवाजात काम करता-करता ऐकत असे. ‘आपली आवड’ दुपारी बारा वाजता सुरू होई. त्यावर खूप छान मराठी गाणी वाजत. त्यात ना.धों. महानोरांचे ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी’ किंवा ‘माळ्याच्या मळ्यामंधी पाटाचं पाणी जातं, गुलाब जाई-जुई मोगरा फुलवित’ अशी गाणी लागत. ती गाणी आणि माझ्या शेतातले चित्र एकजीव झालेले असे. त्यामुळे मला मनातून खूप आनंद होत असे. त्या आनंदाच्या भरात मीही मोठ्या आवाजात भान हरपून रेडिओसोबत ते गायची. आमच्या शेतात काम करणाऱ्या स्त्रिया, गडी-माणसे कुतुहलाने काम सोडून ऐकत. माझ्या आवाजाचे खूप कौतुक करीत. दुपारच्या वेळी जेवणाच्या सुटीत त्या मला खूप छान जात्यावरची, लग्नातली गाणी म्हणून दाखवीत. मी त्यांना श्यामच्या आईच्या गोष्टी वाचून दाखवत असे. त्या ऐकून त्या गहिवरून येत. स्वत:च्या आठवणी, करुण कथा सांगून रडत. सगळे वातावरणच भावूक होऊन जाई. मग आई हळूच काही तरी गमती-जमती करून वातावरणातला ताण हलका करीत असे. शेतावर कामाला येणाऱ्या या सर्व गरीब, कष्टकरी महिला होत्या. त्यात कुणी गरीबाघरची सासुरवासिण असत. त्यांच्या घरात खाण्या-पिण्याची आबाळ असे. दुपारच्या जेवणात त्या पातळ वरण, आमटी-भाकरी आणि ठेचा आणत. कधी-कधी तर शिळ्या भाकरीवर नुसताच ठेचा असायचा. त्यामुळे आई घरात दुसर्या तिसऱ्या दिवशी होणाऱ्या ताकाची कळशी भरून आणत असे. शिवाय दुपारच्या जेवणाआधी कुणा एकीला थोडे अगोदर पाठवून शेतातल्याच लावलेल्या भाज्यांतून ताजी भाजी घेऊन दररोज वेगळी भाजी बनवायला सांगत असे. त्यामुळे त्या सगळ्या जणी गरमागरम भाजीसोबतच ताक, खार, ठेचा, भाकरी शिवाय त्यांच्या भाज्यांसोबत मनसोक्त गप्पा आणि भरपेट जेवत असत. माझ्या आईच्या या कृतीचा माझ्यावर नकळत खूप परिणाम होत असे. आई असाक्षर आहे, पण तिने गरजूंवर आणि मुक्या प्राण्यांवर खूप प्रेम केले. अजूनही करते. शिक्षणाची तिला खूप आवड आहे. सर्वांनी खूप शिकले पाहिजे, असे तिला मनापासून वाटत असे. अगदी आजही तिच्या वयाच्या 85 व्या वर्षीही तिला कुणी भेटले की ती त्याला मुलांच्या शिक्षणाबद्दल हमखास विचारते. माझे व्यक्तिमत्त्व घडवण्यात, कलागुणांना वाव देण्यात तिचा खूप मोठा वाटा आहे.
भावनेशी नातं जुळण्याच्या याच काळात मी वाचनाकडे वळले, ते मात्र जरा अपघाताने! झाले असे, एकदा दसऱ्याच्या निमित्ताने घराची साफसफाई, सारवणे-पोतेरा सुरू होते. घरातल्या सगळ्या वस्तू अंगणात काढून धुणो-पुसणे सुरू होते. त्यात एका पोत्यात कागद-पुस्तके आणि बरेच काय काय कोंबून ठेवलेले होते. ‘मामाच्या कामाची कागदे असतील’ म्हणून आई ते तसेच बांधून ठेवत असे. मी म्हटले, ‘बघू काय काय आहे’, म्हणून पोते खाली ओतले. तर त्यात बरीच जाडजुड पुस्तके होती. मी एक-एक हातात घेऊन पाहू लागले तर त्यावर छान-छान चित्रे होती, म्हणून मग मी आत उघडून पाहू लागले. थोडे वाचू लागले. तर त्यात छान ओघवत्या भाषेत गोष्टी होत्या. ज्या मी कधी वाचल्या-ऐकल्या नव्हत्या. ना.स. इनामदार, रणजित देसाई, शिवाजी सावंत, वि.स. खांडेकर यांच्या, ना.सी. फडके यांच्या कादंबऱ्या होत्या. मी वाचत बसले काम सोडून. पोतार्याच्या मातीने भरलेली पुस्तकांच्या आणि उतरंडीच्या गाडग्या-मडक्याच्या ढिगार्यात बसून. दिवस कधी मावळायचा कळायचेच नाही. आई रागाने ओरडू लागायची तेव्हा भानावर यायचे. मग ती सारी पुस्तके मी पोत्यातून काढून फडताळात रचून ठेवली. आता शाळेतून घरी आले की घरची कामे करताना रेडिओ ऐकणे आणि कामे आटोपली की पुस्तक वाचत बसणे, असा दिनक्रम सुरू झाला. एवढ्या लहान वयात एवढी जाडजूड पुस्तके मन लावून वाचताना कधी रडणार्या, कधी हसणाऱ्या मला पाहून आईला अप्रूप वाटायचं. वाचनाने मला अधिकचे कळू लागले. मी शांत आणि स्थिर झाले. वाचणे ऐकणे, काम करणे, अभ्यास करणे या आणि अशा कामात मी इतकी गुंतून गेले ती आजतागायत! त्यात आता ‘लिहिणे’ हे अधिकचे समाविष्ट झाले. या सगळ्यात मी इतकी व्यस्त झाले की आयुष्यात कधी कंटाळा आला, बोअर झाले, काही सुचत नाही काय करावे, अशा गोष्टींना वेळच मिळाला नाही. हे करताना सुरुवातीला मी कधी कविता लिहीन असे वाटले नव्हते. पण खूप वाचले की खूप प्रश्न पडतात. मनात काही द्वंद्व निर्माण होतात. मीही त्याला अपवाद नव्हते.
मनाला टोचणाऱ्या, बोचणाऱ्या गोष्टींना मी वहीत लिहून ठेवू लागले. पुढे मैत्रिणींनी वाचल्यावर त्यांना ते आवडू लागले. हे वय होते पंधरा-सोळा वर्षाचे! पुढे वयासोबत विचारात प्रगल्भता येत गेली ती कवितेतून उतरत गेली. मी भारावून लिहीत राहिले. कधी योगायोगाने कधी, तर कधी कार्यक्रमांतून ज्यांना अभ्यासत ऐकत मोठी झाले होते ते मधु मंगेश कर्णिक, पुरुषोत्तम पाटील, मंगेश पाडगावकर, उर्मिला पवार, हिरा बनसोडे, नामदेव ढसाळ, मल्लिका अमरशेख या कवी-लेखकांच्या प्रत्यक्ष भेटी होऊ लागल्या. तेव्हा लक्षात आले की हे कवी मला ‘इतके जवळचे’ का वाटत होते. नंतर महानोर दादांच्या अनेकदा भेटी होत गेल्या. एक अनौपचारिक नाते निर्माण झाले. पुढे त्यांनी माझ्या ‘अरुंद दारातून बाहेर पडताना’ या कविता संग्रहाला प्रस्तावना लिहिली. एकदा अनौपचारिक गप्पांत वाङ्मयीन वृत्ती-प्रवृत्तींबद्दल बोलताना आदरणीय महानोरदादा म्हणाले होते, ‘तुला तुझ्या या वाङ्मयीन प्रवासात अनेक छोट्या-छोट्या माणसांत ‘मोठी’ माणसे भेटतील आणि मोठ्या वाटणाऱ्या माणसांत ‘छोटी’ अनुभवायला येतील.’ आणि खरेच, नंतरच्या काळात मला त्यांच्या या वाक्याची प्रचीती अनेकदा आली.
अलीकडे गावात खूप बदल झालेत. गावाचा स्वभाव बदलला तसा गावाचा आणि नात्यागोत्यांचा चेहरा-मोहराही बदलला. सतत पाझरणारी पूर्वीची ओल आटत जाऊन मनात, शिवारात एक प्रकारचा रुक्ष कोरडेपणा आला आहे. कुचकामी शिक्षणातून निर्माण झालेल्या बेरोजगारीमुळे आशावादाची जागा निराशावादाने कधी घेतली काही कळलेच नाही. एकेकाळी सुकाळ असणा:या गावावर आता सततच्या कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाची चिंतातूर काळी छाया पसरून असते. ज्या झाडाच्या सावलीत शेतक:याने बायको-लेकराबाळांसोबत चार-दोन सुखाचे घास घेतलेले असतात, त्याच फांदीला जीवजित्रबाच्या साक्षीने तो फाशी घेताना दिसतो आहे. यामागची तडफड, अस्वस्थता कुणालाच कशी समजत नाही? सरकारच्या निष्ठूर कारभाराने आणि निर्दयी सावकारांच्या तगाद्याने वेठीस धरलेला माझा मातीचा माणूस ढेकळासारखाच विरून चालला आहे. त्याचे हे विरून-जिरून जाणो मला खूप कासावीस करते. कधीकाळी गावाची आब पदरात जपणा:या मायमाऊल्यांचा पदर उघडा पडत जाणा:या तिच्या संसाराला झाकताना अपुरा पडतोय. त्यात त्यांची होणारी दमछाक, घालमेल पाहून मी अस्वस्थ होते. आपण या त्यांच्या परिस्थितीत काहीच करू शकत नाही. ही असहायता, अगतिकता आपण दुबळे असल्याची जाणीव करून देते. हे वांझोटे लिहिणो काहीच कामाचे नाही! असेही वाटते कधी कधी! आणि यातून सुटका करून घेण्यासाठी माझ्याजवळ पुन्हा कवितेशिवाय पर्याय नसतो कुठलाच. मी लिहिते-
‘दुष्काळी दु:खात
आटत जाते नात्याची ओल
तेव्हा थोपवता येत नाहीत
पिकांचे झडते बहर
आणि
झाकताही येत नाही
तळ्याचा उघडा पडत जाणारा तळ
चिमूटभर इच्छांना
उन्हाच्या झळा भाजून काढतात तेव्हा
घडाभर पाण्याचं उसनं अवसान तरी
कुठून आणावं?
निकराच्या संघर्षात
सुखाचं पुनर्वसन करता येत नाही कधीच
माती सोडून स्थलांतर करणा:यांना
हे कसं सांगावं?’
उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी या न्यायाने एकेकाळी ‘राजा माणूस’ म्हणून असलेली शेतकऱ्याची ओळख पुसून जात आता ‘वेठबिगार’ ही त्याची होत असलेली नवी ओळख समाजासाठी आणि देशासाठी खूप मानहानीकारक आहे. पण व्यापारधार्जिण्या सरकारला हे कळणो शक्य नाही. असो.
समाजप्रबोधन हे साहित्याचे मुख्य प्रयोजन जरी नसले तरी समाजातील विकृतीवर, व्यंगावर भाष्य करताना नकळत साहित्यातून समाजप्रबोधन घडत असते. स्वातंत्र्यलढय़ाच्या प्रेरणादायी कालखंडामध्ये लिहिले गेलेले साहित्य शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, दया पवार यांच्या कविता, पोवाडे, स्फूर्ती गीते, गाणी सर्वसामान्यांच्या मनात लढण्याचे बळ निर्माण करून प्रोत्साहित करणारी होती. त्यामुळे आजही प्रेरणादायी साहित्याचे संमेलन, लेखक-वाचक मेळावे भरायला हवीत. अशा प्रकारच्या संमेलनांतून साहित्यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक प्रश्न गांभीर्याने चर्चेत येतात. बदलत जाणाऱ्या समाजाच्या जीवन-जाणिवांचा अंदाज येतो. सुसंवाद, विसंवाद, मतांची मांडणी, विरोध, नकार असे साहित्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते. शिवाय वाचक-रसिकांना साहित्यिकांच्या सहवासाचा आनंद मिळतो. अभिरूची निर्माण होण्यासाठी संमेलनांचा खूप फायदा होतो. तसेच त्या-त्या परिसरातील नव्याने लिहिणा:यांना मोठय़ा प्रमाणात संधी मिळते. त्यातून जे सकस, दर्जेदार असते ते कालांतराने इतर ठिकाणी पोहोचते.
झोपलेल्यांना जागे करणो, बसलेल्यांना चालते करणो आणि विचार करणाऱ्यांना लिहिते करणो-बोलते करणो हेच तर साहित्य निर्मितीतील मुख्य तत्त्व आहे आणि ते अशा संमेलनांतून काही प्रमाणात का होईना साध्य होत असते. जोर्पयत स्वत:च्या वृत्तीचा शोध स्वत:लाच लागलेला नसतो तोर्पयत सगळे ठीक असते, पण जेव्हा आपल्याला नक्की काय हवेय, याचा शोध लागतो. तिथून पुढे समानधर्मीयांचा शोध सुरू होतो. तो शोध संवादाची भूक वाढवणारा असतो. अस्वस्थ करणारा असतो. कलावंताच्या या अस्वस्थ मन:स्थितीबद्दल आसपासची दुनिया फार काळ विचार करीत नाही. त्यांचे असे म्हणणो आहे की, कलावंतांना निर्मितीच्या वेदना या असतातच आणि त्यांनी त्या स्वत:च निर्माण केलेल्या असतात. काही अंशी ते खरेही आहे. सूर्योदयाची चाहूल पाखरांना जशी सर्वात अगोदर लागते तशी संकटाची चाहूल प्राण्यांना! मग इतरांना सूचित करण्यासाठी त्यांची जशी धडपड चालते, अगदी तशीच काहीशी अवस्था अतितीव्र संवेदनशील, सृजनशील मंडळींची झालेली असते. काळाच्या उदरात काय दडलेय हे सांगायचे सामथ्र्य त्यांच्याकडे असते आणि म्हणूनच कवी, लेखक, कलावंत अनिष्ट चालीरिती, दांभिकतेवर, समाजातील व्यंगावर बोट ठेवून दिशादर्शनाचे काम आपल्या साहित्याच्या, कलेच्या माध्यमातून करून समाज मनाला सजग करण्याचे काम करत असतात. एक प्रकारे समाजाप्रती जागल्याची भूमिका पार पाडत असतात.
जे जे आपणाशी ठावे। ते ते जनास सांगावे।।
शहाणे करोनि सोडावे। सकलजन।।
व्यक्त होण्याच्या या उत्कट अनुभूतीमागे हेच मुख्य कारण असते. साहित्यनिर्मितीतील एक उदा. पाहण्यासारखे आहे.
रामायण लिहून पूर्ण झाल्यावर वाल्मिकींनी ते नारदाला दाखवले. नारदाने ते वाचले पण त्याचे समाधान झाले नाही. ते म्हणाले की, ‘हनुमानाचे रामायण यापेक्षा चांगले आहे.’ हनुमानानेही रामायण लिहिले आहे हे वाल्मिकींना माहीत नव्हते. ते त्यांच्या शोधात निघाले. दोघांमध्ये कोणाचे रामायण खरे आहे, हे त्यांना जाणून घ्यायचे होते. कर्दळी वनामध्ये केळीच्या झाडावर सात मोठय़ा पानांवर लिहिलेले रामायण त्यांना सापडले त्यांनी ते वाचले आणि ते सर्वोत्कृष्ट असल्याचे आढळले. व्याकरण आणि शब्दसंग्रह, श्लोक आणि लय याचा मोठा समतोल त्यांच्याकडे होता. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हे पाहून हनुमानाने विचारले, तुम्ही का रडत आहात? वाल्मिकी म्हणाले, तुमचे रामायण इतके सुंदर आहे की, आता माझे रामायण कोण वाचणार?
हे ऐकून हनुमानाने ती पाने फाडून टाकली आणि ते म्हणाले, ‘आता हनुमानाचे रामायण कोणी वाचू शकणार नाही.’ वाल्मिकी स्तब्ध झाले. त्यांनी हनुमानाला असे का केले, असे विचारले. त्यावर हनुमान हसले आणि म्हणाले, तुम्हाला माझ्यापेक्षा तुमच्या रामायणाची जास्त गरज आहे. जगाला वाल्मिकी आठवावेत म्हणून तुम्ही रामायण लिहिले
तेव्हा वाल्मिकींना कळले की आपले रामायण हे महत्त्वाकांक्षेचे फळ आहे. तर हनुमानाचे रामायण भक्ती आणि आपुलकीचे फळ आहे. अगदी आजही हनुमानासारखे आत्मसन्मानासाठी कार्य करणारे आणि लिहिणारे लोक आहेत.
लेखकाने आपल्या शब्दांखाली सगळ्यांना झाकून घ्यावे. सर्वाना मायेची उब द्यावी. चांगल्या-वाईटाला आईच्या मायेने निस्तरावे. सावरावे. सगळ्यांची माऊली व्हावे, दु:खावर, फाटकेपणावर हळुवार फुंकर घालावी. हताश, निराश, पोळलेल्या जीवांना डोळाभर जिव्हाळी नजरेने पाहावे. एकटेपणात, संकटात सोबतीची हमी देऊन मानसिक, भावनिक बळ द्यावे. वेळप्रसंगी अवखळपणाचा कान पकडून वठणीवर आणावे. दीन-दुबळ्या, शोषित, पीडित दु:खी जीवांच्या इच्छांचा हुंकार व्हावे तर वेळप्रसंग विचारांची मशाल पेटवून लढण्याचे सामथ्र्य निर्माण करावे. लेखकाच्या कलाकृतीने, साहित्याने समाजात निर्माण झालेली पोकळी अशा रितीने भरून काढण्याचा प्रयत्न करावा. तुकारामांना जसं बाप होता आलं आणि ज्ञानेश्वरांना माऊली! तसे कारण लिहिताना केवळ शब्द किंवा वाक्येच महत्त्वाची नसतात तर त्यातल्या रिकाम्या जागासुद्धा महत्त्वाच्या असतात. त्या वाचता आल्या पाहिजेत. हे वाचता येणो म्हणजेच जगणं समजून घेणं आहे. आणि मला आनंद आहे की, प्रत्येक कालखंडात त्या त्या वेळच्या बदलत्या जीवन जाणिवा समर्थपणाने साहित्यातून व्यक्त झाल्या आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळात वेगवेगळ्या पातळीवरून झालेल्या जनजागृतीमुळे साहित्यात खुपे नवे प्रवाह निर्माण झाले. खूप वेगळ्या आणि नव्या जाणिवा मोकळेपणाने कथा, कविता, नाटक, आत्मकथन आणि कादंबरीतून मांडल्या जाऊ लागल्या आहेत. अनेक युगांपासून दबलेल्या आणि दाबलेल्या मुक्या भावना त्यामुळे उसळी मारून वर येत आहेत. यात स्त्रियांचे आणि दलितांचे, भटक्या-विमुक्तांचे साहित्य मोठय़ा प्रमाणावर आहे. पण या सगळ्यांसोबत आज इतक्या वर्षाच्या माङया या प्रवासात काही गोष्टी मनाला खटकतात, त्रास देतात, त्याबद्दल बोलणोही गरजेचे आहे, असे मला वाटते. प्रगल्भ मांडणीमुळे त्या नव्या प्रवाहांची नोंद घेण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून अभ्यासकांनी दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, आदिवासी, ग्रामीण अशी त्याची विभागणी केली. पण हळूहळू ही विभागणी आमच्या मानसिकतेत फूट पाडण्यासाठी कारणीभूत ठरली. यातून पुन्हा स्त्रियांचे साहित्य, दलितांचे साहित्य, अशी वर्गवारी समोर आली. गटातटाचे राजकारण तयार होऊन एक वेगळीच कंपूशाही निर्माण झाली. एकमेकांचे वाचणो, चर्चा करणो, मत मांडणे, खोडणे या वाङमयीन आनंदाचे पार वाटोळे झाले.
साहित्यामध्ये पुरस्कारांसाठी लॉबिंग सुरू झाले. अगदी महत्त्वाचे, सन्मानाचे वाटणारे पुरस्कारही गेल्या काही वर्षात असेच मिळताना उघडपणे दिसत आहेत. गटागटाने राहणारे हे लेखक दुसऱ्या गटातील लेखकाचा दुराग्रह करताना दिसतात. कुणाचे पुस्तक पाडायचे आणि कुणाचे उचलायचे, चर्चेत आणायचे हे सर्व आजूबाजूला घडताना दिसत आहे. एखाद्या चांगल्या लेखकाचा द्वेष करणो, न वाचताच त्या कलाकृतीचे मूल्यहनन करणो, उपेक्षा करणे.,अनुल्लेखाने मारणे हे वाङमयबाह्य वर्तन करून खुन्नस काढण्यात धन्यता मानू लागले आहेत. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय तर ज्यांना समाज चांगला लेखक समजतो असे चांगले लेखक गलिच्छ मतप्रवाहाचे नेतृत्व कधी उघड तर कधी अंधारातून करताना दिसत आहेत. चांगला लेखक सर्वाचे, मानवी मनाचे प्रतिनिधीत्व करत असतो. त्याची मांडणी ही सर्वसमावेशक असावी, अशी अपेक्षा असते. तो कुण्या एका जातीचा, धर्म, प्रांत, प्रदेशाचा नसतो. दुर्दैवाने याचे भान आजच्या मराठी वा्मयविश्वातील काहींना राहिले नाही, याची खंत वाटते. जातीचे आणि विचारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी या लेखकांनी अनुयायी तयार केले आहेत. ते विरोधात मांडणी करणाऱ्यावर तुटून पडतात. पाहता पाहता आमच्या लेखकांचे ‘नेते’ कधी झाले कळलेच नाही.’ त्यामुळे चांगल्या-वाईटाचा लेखनातील कसदारपणाचा, दर्जाचा विचार न करता ‘तो आपला आहे ना!’ या ‘आपलेपणाची’ बाधा मराठी साहित्याला झाली आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. खरे तर, लेखक समाजाला दिशा दाखवण्यासाठी असतो. त्याचा समाजाला धाक वाटला पाहिजे. पण आता असे स्वत:च बाधीत झालेले लेखक समाजाला काय ‘ढेकळं’ दिशा दाखवणार? अलीकडच्या दहा वर्षात समाजात पुन्हा जे मोठय़ा प्रमाणावर जात-पात-धर्म यांचे राजकारण आणि अवडंबर माजले आहे, ते या अशा स्वत:ची पोळी भाजून घेणा:या बुद्धिजीवींमुळेच आहे, असे मला मनापासून वाटते.
मित्रहो! सत्तेच्या माध्यमातून नेहमीच शोषणाचीही नवनवीन बेटे आकाराला येत असतात. त्यामुळे आजच्या लेखकांनी, वाचकांनी, कलावंतांनी समाजाची सर्वार्थी उंची खुजी होताना पाहून आपले मौन सोडले पाहिजे. वैयक्तिक हितसंबंध बाजूला ठेवून सत्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. या सर्व पाश्र्वभूमीवर स्त्रियांच्या साहित्याबद्दल आपण थोडक्यात मागोवा घेण्याचा प्रयत्न करू या! संत कवयित्रींच्या काव्यापासून लिखित साहित्याचा विचार केला तर भक्ती-मुक्तीच्या जीवनरसात चिंब भिजलेली स्त्री कविता जनाबाई वेगळ्या वळणावर घेऊन जातात. ‘डोईचा पदर खांद्यावर घेऊन जाईन मी बाजारात!’ होय निघाले आहे मी देवाचे घर! असे जनाबाईस उद्वेगाने म्हणायला लावणारी आमची समाजव्यवस्था. हिची पाळेमुळे समजून घेताना ताराबाई शिंद्यांइतकीच माझीसुद्धा दमछाक होते. ‘हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियले। तैसे मज झाले पांडुरंगा।’ असे काकुळतीला येऊन कान्होपात्रेला का म्हणावे लागले असेल? असा प्रश्न आमच्या भक्ती-मुक्तीच्या कल्पनेत रमलेल्या समाजाला का पडला नसेल बरे! की स्त्रियांच्या दु:खाला गृहीत धरून ईश्वरभक्ती विरहाच्या त्यागमूलक सिद्धांताच्या नावाखाली कान्होपात्रेचे दु:ख अभ्यासकांनी, संशोधक, समीक्षकांनी जाणिवपूर्वक दुर्लक्षित ठेवले. प्रवचन, कथा, कीर्तनांतून या स्त्रियांच्या दु:खाचे, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे नेहमीच दैवतीकरण होताना दिसते.
जनाबाई, कान्होपात्रेपासून सुरू झालेला स्त्री कवितेचा हा सशक्त प्रवाह आजच्या कवयित्रींनी अधिक जोमदारपणो प्रवाहीत केल्याचे दिसते. छंदातून, मुक्तछंदातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना कधी संयमाने तर कधी आक्रमक होत जाब विचारित स्त्रियांनी अभिव्यक्ती केलेली आहे. स्त्रियांच्या लेखनावर नेहमीच ‘रडकं’ साहित्य ‘पानाफुलांचे’ साहित्य म्हणून टीका होते. पण या टीकेला बाजूला सरकवून स्त्रिया सतत लिहीत आहेत. विविधांगी अनुभव, आशयपूर्ण मांडणी करत त्यांचा लेखन प्रवास अडीअडचणींवर मात करत सुरू आहे. काहीसा इंदिराबाई म्हणतात, या न्यायाने-
‘कुणी निंदावे त्यालाही
करावा मी नमस्कार
कुणी धरावा दुरावा
त्याचा करावा सत्कार
काही वागावे कुणीही
मीच वागावे जपून
सांभाळण्यासाठी मने
माझे गिळावे मीपण’
आज 21 व्या शतकातील समाजातील स्त्रिया मोठा संघर्ष करून प्रत्येक क्षेत्रत मुद्रांकित होण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना समाजाच्या वैचारिक, आर्थिक, सामाजिक विचारांचे भान आले आहे. या सामाजिक रचनेत स्वभिमानाने जगायचे असल्यास मुख्य प्रवाहात यावे लागेल. या ठिकाणी युगायुगांपासून सत्तास्थानी असणा:या पुरुषांनी आपल्याकडून कपट, कारस्थान करून ही सत्ता हिसकावली आहे, हेही स्त्रियांना आता पुरते समजले आहे. जगण्याची झालेली कोंडी, संकोच यातून मार्ग काढण्यासाठी त्या धडपडताहेत.
सत्तेच्या केंद्रस्थानी येऊन निर्णय प्रक्रियेत सहभाग नोंदवू लागल्या आहेत. आणि ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. यातही त्यांचे चारित्र्यहनन होईल, आरोप होतील. अपमान केले जातील. टीका सहन करावी लागेल. पण हे सारे सोसून काम केले, करीत राहिले तरच असहाय्य दुबळ्या स्त्रीचे चित्र पुसले जाऊन खंबीर, करारी, स्वाभिमानी स्त्रीचे प्रसन्न असे नवे चित्र रेखाटता येईल. पुन:पुन्हा तुडवली जाऊनही उभी राहत आपल्या असण्याची घोषणा करणारी ताठ कण्याची हरळीसारखी स्त्री ही येत्या काळात स्त्रियांची आयडॉल असली पहिजे. आमच्या आदिवासी स्त्रिया गवतसदृश्य वनस्पतीला उगीच मैत्रीण (गोईण) म्हणत नाहीत. सुख-दु:खात मदत करणाऱ्या मैत्रीण-मैत्रिणींइतकेच महत्त्व या वनस्पतींचं त्यांच्या जीवनात असते.
मित्रानो,
माझ्यासारखा कवी, लेखक जेव्हा एका मोठय़ाअवकाशाच्या कॅनव्हॉसवर छोटय़ा-मोठय़ा नोंदी घेऊ पाहतो तेव्हा भोवतालाबद्दल त्याला काही एक प्रश्न पडतात. त्या प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेण्याचा माङया अल्पमतीप्रमाणो मी इथे प्रयत्न केला आहे.
मला जाणवलेल्या आजच्या परिस्थितीला अनुसरून, मला आलेल्या कडू-गोड अनुभवावरून ही माझी मते तयार झाली आहेत. मला अजूनही लख्खपणो आठवतेय पाच-सहा वर्षाची चिमुरडी पोर चार आण्याच्या लिमलेटच्या गोळ्या हातात गच्च धरून दगडधोंडय़ांच्या गल्ली-बोळातून धावताना ठेचाळून रक्तबंबाळ होणारी.. सतत काही तरी शोधण्यासाठी धडपडणारी! कधी रंगीबेरंगी नाजूक-सुवासिक फुले तर कधी रंग उडालेल्या जाडय़ाभरडय़ा आयुष्याला रंगविताना इवली-इवली मेंदीची पाने.. कधी भोळ्याभाबडय़ा लोकांच्या श्रद्धांची जागा तर कधी अभावग्रस्त वास्तवात हिरवळीची जागा! आपल्या कलागुणांच्या माध्यमातून जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या थोर माणसांबद्दल मनात प्रचंड कुतुहल घेऊन ही पोर सतत कशाच्या तरी शोधात होती. तिचा ‘तो‘ शोध अजूनही संपलेला नाही. हा! तिच्या फ्रॉकच्या खिशात अनुभवातून शहाणपणाच्या मिळालेल्या चार-दोन गोष्टी मात्र नक्कीच जमा झालेल्या आहेत, हे मात्र खरे!
आपल्यासारख्या गुणीजनांच्या, ज्ञानीजनांच्या सभेत शेवटी इतकेच म्हणेन,
चांदणे नेसून आले।
दु:ख माझे कोवळे
मांडले मी काळजाच्या।
अक्षरांचे सोहळे..
धन्यवाद!