# मी भाजपा का सोडतोय..? -शिवम शंकर सिंह.

भाजपा समर्थक आता हळूहळू माणसात येत आहेत. ग्राऊंड लेव्हलवर काम करणारे कार्यकर्ते असोत अथवा नाना पटोले, यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद यांच्यासारखे लोकनेते असोत, अथवा साध्वी घोसला, प्रद्युत बोरा, महावीर खिलेरी किंवा रूपा सुब्रमण्या यांच्यासारखे आयटी सेल सेलिब्रिटी असोत. ज्यांना स्वतःचे डोके आहे, अशा लोकांना आता हळूहळू कळायला लागले आहे, की पोकळ देशभक्तीचे नारे देता देता आपणच देशाच्या नुकसानीचे कारण बनत चाललो आहोत, म्हणून हे लोक आता भाजपापासून दूर जायला लागले आहेत. यात शिवम शंकर सिंह या अजून एका नावाची भर पडली आहे. नॉर्थईस्ट राज्यांमध्ये भाजपाला विजय मिळवून देणार्‍या टीमचा तो प्रमुख चेहरा होता. राज्यसभा टीव्ही, झी, एनडीटीव्ही अशा वेगेवेगळ्या न्यूज चॅनलवर त्याच्या मुलाखती प्रसारित झालेल्या आहेत. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातून शिकून आलेल्या शिवमने २०१३ ला मोदीजींच्या मार्केटिंगला भुलून भाजपा जॉईन केली होती. मोदीजींमध्ये त्याला आशेचा एक किरण दिसत होता. पण त्याने जे पाहिले, जे अनुभवले, ते त्याच्या सहनशक्तीच्या बाहेरचे होते, त्याच्या मनाला न पटणारे होते. म्हणून तो शेवटी एकदाचा भाजपातून बाहेर पडला. जाता जाता त्याने… मी भाजपातून राजीनामा का देतोय? या शीर्षकाखाली ब्लाॅगवर एक लेख लिहिलाय…

देशातील राजकीय वातावरण सध्या नीचतम पातळीवर आलेले आहे. लोक आपापल्या नेत्याच्या भक्तीत इतके आकंठ बुडालेले आहेत, की तुम्ही त्यांनी पसरवलेल्या खोट्या बातम्या खोट्या आहेत हे पुराव्यानिशी जरी स्पष्ट केले, तरी त्यांना त्याचा पश्चाताप वाटत नाही.

वेगवेगळ्या प्रसारयंत्रणा वापरून भाजपाने काही विशेष संदेश/ मजकूर सामान्य लोकांमध्ये पसरवले आहेत. आणि माझ्या भाजपा सोडण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे. पण ते मेसेजेस काय आहेत, हे पाहण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचे आहे, की कोणताही पक्ष पूर्णपणे चांगला, किंवा पूर्णपणे वाईट नसतो. आजवरच्या प्रत्येक सरकारने काही चांगली कामं केली आहेत, तर काही ठिकाणी माती खाल्लीये.

भाजपाने केलेली काही वाईट कामे: एखादा देश आणि व्यवस्था घडवायला कधीकधी दशकं, शतकं उलटावी लागतात. माझ्या मते भाजपाचे सगळ्यात मोठे अपयश हे आहे, की त्यांनी अतिशय क्षुल्लक कारणांवरून काही चांगल्या गोष्टींची वाट लावून टाकली आहे.

१)Electoral Bonds म्हणजेच निवडणूक रोख्यांबाबत भाजपा सरकारने जो निर्णय घेतलाय, तो सरळ सरळ भ्रष्टाचाराला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रकार आहे.

आपण कोणत्या राजकीय पक्षाला देणगी दिली हे सांगण्याचे बंधन आता मोठमोठ्या कॉर्पोरेट्सवर नाही. समजा उद्या एखाद्या मोठ्या कंपनीने त्यांच्या हिताचा कायदा पास करून घेण्यासाठी एखाद्या पक्षाला एक हजार करोड रुपये किमतीचे निवडणूक रोखे देणगी म्हणून दिले, तर त्याची कसलीही चौकशी होणार नाही. कारण यासंदर्भातली कोणतीही माहिती उघड करण्याचे त्यांच्यवर बंधनच नाही. वरच्या लेव्हलवर भ्रष्टाचार कमी का झाला, याचे हे चांगले उदाहरण आहे.

२)सरकारने सुरू गेलेल्या योजनांची किती प्रमाणात अंमलबजावणी झालीये, त्याचा किती प्रमाणात आणि काय फायदा होतोय वगैरे महत्त्वाची माहिती योजना आयोगाच्या रिपोर्ट्समधून मिळायचा. पण भाजपा सरकारने योजना आयोगच बरखास्त करून टाकला. त्यामुळे आता सरकार जो डेटा सांगेल, त्यावर विश्वास ठेवण्यावाचून तुमच्याकडे काहीही पर्याय नाही. (CAG ऑडिटमधून माहिती मिळू शकते, पण तसे ऑडिट होण्यात बराच वेळ निघून जातो.)
योजना आयोगाला बरखास्त करून नवीन नेमण्यात आलेला नीती आयोग म्हणजे बेसिकली सरकारची पी.आर. एजंसी आहे.

३)मला जेवढं कळतंय, त्यानुसार सीबीआय आणि एन्फोर्समेंट डिपार्टमेंट (ED) चा वापर फक्त विरोधकांवर दबाव आणण्यासाठीच केला जातोय.

४)अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांची आत्महत्या, जज लोया यांची हत्या, सोहराबुद्दीन मर्डर, बलात्कार आणि बलात्कारितेच्या वडिलांच्या खुनाचा आरोप असलेल्या नेत्याचा बचाव इत्यादी घटनांची चौकशी करण्यात आलेले अपयश.

५)डिमॉनिटायझेशन पूर्णपणे अयशस्वी झाले. पण त्यापेक्षा वाईट म्हणजे भाजपा हे अमान्य करणे, की ते अयशस्वी प्रकरण आहे.
आतंकवाद्यांची फंडिंग थांबली, कॅशलेस इकॉनॉमी, भ्रष्टाचार थांबला ही कारणं अगदी हास्यास्पद आहेत.

६) GST ज्या गडबडगोंधळात लागू केली, त्यामुळे फायदा होण्याऎवजी नुकसानच झाले. आशा आहे, की येत्या काही काळात सगळे सुरळीत होईल, पण याची अंमलबजावणी करण्यात आपण चुकलो, हेही भाजपा कबूल करत नाहीये. हे मुजोरपणाचे लक्षण आहे.

७)फक्त टाळ्या मिळवण्यासाठी केलेल्या परराष्ट्र धोरणाचा पुरता फज्जा उडाला आहे. चीनने श्रीलंकेतील मोक्याच्या ठिकाणी असलेले बंदर आपल्या ताब्यात घेतले आहे.
आता चीन पाकिस्तान आणि बांगलादेशसोबत जवळीक साधत आहे.

मालदीवने भारतीय कामगारांना वर्क परमिट आणि बिझनस व्हीजा देणे बंद केले आहे. आणि दुसरीकडे मोदीजी परदेशात जाऊन, “भारतीयांना २०१४ पूर्वी जगात कुठेही मान-सन्मान मिळत नव्हता, पण आता सगळीकडे त्यांना मान-सन्मान मिळायला लागला आहे.” असे सांगत असतात. किती अर्थहीन बोलणे आहे हे ! भारतीयांना मिळणार्‍या मान-सन्मानाला बर्‍याच अंशी आपली आय.टी. इंडस्ट्री आणि पूर्वीपासून सतत वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आणि त्याचे छटाकभरही क्रेडिट मोदीजींना जात नाही. उलट मॉब लिंचिंग, पत्रकारांना मिळणार्‍या धमक्या वगैरेंमुळे आपली इमेज खराब होण्यातच मदत होत आहे.

८)विविध योजना अयशस्वी ठरत आहेत आणि त्यांचे अपयश कबूल करून त्यात सुधारणा घडवून आणण्याचे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीयेत. उदा. फसल बीमा योजना, सांसद आदर्श ग्राम योजना, मेक इन इंडिया, स्किल डेव्हलपमेंट इत्यादी. शेतकर्‍यांच्या आणि बेरोजगारांच्या समस्या जाणून घेण्याऎवजी प्रत्येक मुद्द्याला भाजपा सरकार विरोधकांचे षडयंत्र म्हणून आपली जबाबदारी झटकून टाकत आहे.

९)पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावर कॉंग्रेसवर तुटून पडणारे भाजपायी आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त असूनही पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे समर्थन करत आहेत. हे मुळीच स्वीकारार्ह नाही !

१०)शिक्षण आणि आरोग्य या अगदी मूलभूत विषयांकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षण क्षेत्रात काहीही बदल होत नाहीयेत, हे देशाचे मोठे अपयश आहे. गेल्या दशकभरात भारतातील सरकारी शाळांची दयनीय अवस्था झालेली आहे, आणि अजूनही त्यात काहीही सुधारणा होत नाहीये. (‘ASER-असर’ म्हणजे Annual Status Education चा अहवाल.)

गेल्या 6 वर्षांमध्ये भाजपाने आरोग्याच्या क्षेत्रातही काही केलेले नाही. नाही म्हणायला ‘आयुष्मान भारत’ या योजनेची घोषणा केली आहे. पण आरोग्याच्या क्षेत्रात काहीही न करण्यापेक्षा या स्कीमचीच मला जास्त भीती वाटायला लागली आहे. अशा विमा योजनांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला नाहीये. अशा योजनांद्वारे आपण अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवत आहोत, जे की आरोग्य क्षेत्राच्या बाबतीत अतिशय चुकीचे पाऊल आहे. (मायकल मूर यांची Sicko ही डॉक्युमेंट्री पाहा.)

भाजपाने केलेली काही अत्यंत वाईट कामे: भाजपाने सगळ्यात वाईट काही केले असेल, तर ते म्हणजे देशातील एकंदरीत सगळेच वातावरण गढूळ करून टाकले आहे. पण हे त्यांचे अपयश नाही, तर त्यांची अतिशय पद्धतशीरपणे आखलेली योजना आहे.

१)याच स्ट्रॅटजीचा एक भाग म्हणजे, जे पत्रकार ‘मुद्द्यांवर’ आवाज उठवत आहेत, त्यांना पेड पत्रकार किंवा कॉंग्रेसी दलाल ठरवून टाकणे. अशा प्रकारे ते त्या पत्रकारावर वैयक्तिक हल्ले करतात आणि मूळ मुद्दा बाजूलाच राहतो.

२)देशात मागील ७० वर्षांत काहीही चांगले झाले नाही, असाही एक अपप्रचार केला जातो. हा तर खोटारडेपणाचा कळस आहे, आणि ही मानसिकताच देशासाठी नुकसानदायक आहे.

भाजपा सरकारने आत्तापर्यंत जाहिरातींवर ४,००० करोडपेक्षा जास्त खर्च केला आहे. त्यांना पाहिजेत तशाच गोष्टी आता ते आपल्या मनावर बिंबवतील. उदा. मोदीजी काही पहिले नाहीत ज्यांनी रस्ते बांधलेत.

मी आजवर प्रवास केलेले सगळ्यात चांगले रस्ते मायावती आणि अखिलेश यादव यांनी बांधलेत. भारत IT ची महासत्ता ९० च्या दशकातच झाला होता.

३)भाजपाची मदार फेक न्यूज आणि तिच्या प्रसारावर अवलंबून आहे.
इंटरनेटवर काही अ‍ँटी-भाजपा फेक न्युज बनवणार्‍या वेबसाईट्सही आहेत, पण भाजपाच्या वेबसाईट्सपुढे त्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. या अशा वेबसाईट्सना सरकारचा जो राजाश्रय मिळतोय, त्यामुळे आपल्या समाजाचे खूप नुकसान होत आहे, हेच मुळी आपल्याला कळत नाहीये.

४)”हिंदू खतरे में है” ही खोटी भावना लोकांच्या मनात निर्माण करणे हेच भाजपाचे काम झाले आहे. हे सरकार आल्यापासून लोकांची विचारसरणीच बदूलन गेलीये. आपण हिंदू २००७ मध्येसुद्धा धोक्यात होते का ? मी तर त्यावेळी हे वाक्य कधीही ऎकले नव्हते. हिंदूंच्या राहणीमानात काही सुधारणा घडवून आणण्याऎवजी उलट भाजपाने हिंदूंच्याच मनात एक भीतीची आणि द्वेषाची भावना निर्माण केली आहे.

५)सरकारविरोधात काही बोलाल, तर तुम्हाला लगेच देशद्रोही ठरवले जाते. आणि सध्या हिंदूविरोधी ठरवले जात आहे. भाजपा नेत्यांना स्वतःला वंदे मातरम्‌ म्हणता येत नाही, पण ते दुसर्‍याला बळजबरी वंदे मातरम्‌ म्हणायला सांगतात आणि त्यावरून इतरांची देशभक्ती मोजतात. मला स्वतःला माझ्या राष्ट्रवादी असण्याबद्दल अभिमान आहे आणि मला माझा राष्ट्रवाद दाखवण्यासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही.
जिथे गरज असेल किंवा मला जेव्हा वाटेल, तेव्हा मी जन गण मन म्हणेन किंवा वंदे मातरम्‌ म्हणेन. ते म्हणण्यासाठी मी माझ्यावर कोणाला जबरदस्ती करू देणार नाही !

६)हिंदू-मु्लिम, देशभक्त-देशद्रोही, भारत-पाकिस्तान. हे २४ तास चालवणारे काही न्युज चॅनल भाजपा नेत्यांचेच आहेत.
यांचा मुख्य उद्देश तुमचे लक्ष तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या प्रश्नांवरून/मुद्द्यांवरून हटवून तुम्हाला हिंदू-मु्लिम, देशभक्त-देशद्रोही, भारत-पाकिस्तान यात अडकवण्याचा आहे.

७)विकासाचा मुद्दा तर कधीचाच बाद झालेला आहे. पुढील निवडणुकांसाठी भारतीय समाजाचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण करणे आणि पोकळ देशभक्तीला प्रोत्साहन देणे हीच भाजपाची स्ट्रॅटजी आहे. मोदीजींनी स्वतःच अनेक वेळा फेक न्युज पसरवलेल्या आहेत.

काँग्रेस नेते भगत सिंहांना भेटायला गेले नव्हते, मनमोहन सिंह गुजरातमध्ये पाकिस्तानची मदत घेत आहेत, जिन्ना, नेहरू, तुकडे-तुकडे गँग, जेएनयु.. हा सगळा एक पद्धतशीरपणे केला जाणारा अपप्रचार आहे. लोकांची माथी भडकवा, दंगल घडवून आणा आणि निवडणुका जिंका.मला माझ्या नेत्याकडून हे सगळे ऎकायचे नाहीये. अशा नेत्याचे मी आता समर्थन करू शकत नाही, जो स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सगळ्या देशाला दंगलीच्या आगीत ढकलू शकतो.

ही फक्त काही मोजकीच उदाहरणं आहेत, ज्याद्वारे भाजपा देशाची वाट लावत आहे. मी यासाठी भाजपा जॉईन केलेली नव्हती. आणि मी आता याचे समर्थनही करू शकत नाही. …म्हणून मी भाजपातून बाहेर पडत आहे.

२०१३ ला मोदीजींमध्ये मला देशाच्या उज्ज्वल भविष्याचा एक आशेचा किरण दिसत होता. मी त्यांच्या विकासाच्या मॉडेलला भुललो होतो. आज विकासाचे ते मॉडेलही गायब झालेले आहे आणि आशेचा तो किरणही गायब झालेला आहे.
मोदी-शाह सरकारच्या पॉझिटीव्ह कामांपेक्षा त्यांच्या निगेटीव्ह कामांचीच यादी मला खूप मोठी दिसत आहे.

लक्षात ठेवा, ‘अपप्रचाराला बळी पडणे’ आणि ‘एखाद्याची आंधळी भक्ती करणे’ याच्याएवढे वाईट काम दुसरे कोणतेही नसेल. असे करणे लोकशाही आणि देशहिताच्या विरोधात आहे. आपली विचारधारा किंवा आपला पक्ष कोणताही असो, पण आपल्या सगळ्यांना गुण्यागोविंदाने एकत्र राहता येईल, एकत्र काम करता येईल आणि एक विकसित भारत बनवता येईल याची काळजी घ्या.
-शिवम शंकर सिंह यांच्या ब्लॉग वरून साभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *