नांदेड: सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्त्या केली तर त्याची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे, चर्मकार समाजातील तर अनेक युवकांचे व महिलांचे खून करण्यात आले, यासाठी मोर्चे काढून सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली पण त्याकडे शासन प्रशासनाने आजवर दुर्लक्ष केले, आम्ही माणसे नाहित काय? आमच्यावर हा अन्याय का? चर्मकार समाजावरील अन्यायांची सीबीआय चौकशी का करण्यात येत नाही ? असा संतप्त सवाल चर्मकार ऐक्य परिषदेचे महासचिव इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी उपस्थित केला आहे.
देशाचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे निवेदन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते आणि चर्मकार ऐक्य परिषदेचे महासचिव इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी पाठविलेआहे. त्यात आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. आमच्यावरील अन्याय अत्याचारांची दखल का घेतली जात नाही ? आम्ही माणसे नाहित काय? आम्हाला जगण्याचा अधिकार नाही काय? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
नखेगाव येथे चर्मकार माय लेकींची क्रूर हत्त्या करण्यात आली, पानभोसी येथे चर्मकार वयोवृद्ध महिलेची होळीच्या दिवशी जाळून हत्त्या करण्यात आली, मालेगाव येथे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची हत्त्या करण्यात आली, रुईखेड मायंबा येथे चर्मकार महिलेची नग्न धिंड काढण्यात आली, गोणार येथे संतोष भालके या युवकाचे अपहरण करून क्रूरपणे खून करण्यात आला, प्रेताचे चार तुकडे करुन तलावात फेकून देण्यात आले, दोन तुकडे सापडले आणि अद्याप दोन तुकडे सापडले नाहित, जत तालुक्यात सविता सोनवणे या युवतीवर बलात्कार करुन खून करण्यात आला, सोलापूर येथे शालेय मुलीवर बलात्कार करण्यात आला, हिवरा येथे शेळ्या चारणाऱ्या मुलीवर, बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर, गोंदिया येथे पाच वर्षाच्या मुलीवर तर जालना येथे सत्तर वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार करण्यात आला. असे असंख्य अन्याय अत्याचार महाराष्ट्रात चर्मकार समाजावर झालेले आहेत व रोज होत आहेत. या प्रकरणी आंदोलने करण्यात आली, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशीची मागणी करुनही आजवर आमची दखल घेण्यात आली नाही, असे का? न्यायाच्या बाबतीत जातीय भेदभाव का केला जात आहे? असा संतप्त सवाल इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी या निवेदनातून उपस्थित केला आहे.
उपरोक्त घटना जातीयवादी भावनेतून घडल्या असूनही कांही प्रकरणे दाबून टाकण्यात आली, कांही प्रकरणे निकाली काढण्यात आली, कांही प्रकरणात आरोपींना निर्दोष सोडण्यात आले, कांही प्रकरणांत किरकोळ शिक्षा सुनावण्यात आली. या सर्व प्रकरणांत सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली परंतु कोण दखल घेणार? आमच्या बापाने कायदा लिहिला परंतु मनुवादी व्यवस्थेत आम्हालाच न्याय मिळत नाही, अशी खंतही या निवेदनाच्या शेवटी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी व्यक्त केली आहे.
बीड जिल्ह्यातील केेज तालुक्यात सावळेश्वर पैठण येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या सूरज कांबळे या चर्मकार युवकाला गावातील जातीयवादी लोकांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले असले तरीही युसूफ वडगाव पोलीस स्टेशनला कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल न करता फक्त ३२४ वर बोळवण करण्यात आली आहे. उलट क्रॉस कंम्पलेन घेऊन या चर्मकार युवकावर गंभीर गुन्हे दाखल करुन त्याचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे असे कुठवर चालायचे? या प्रकरणी देखील सीबीआय चौकशी करण्यात यावी व गुन्हेगारांना अभय देणाऱ्या पोलीसांनाही आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्यात यावे? अशी मागणीही या निवेदनाच्या माध्यमातून चर्मकार ऐक्य परिषदेचे महासचिव इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रति केंद्रीय आणि राज्याच्या गृह मंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहेत. या वाढत्या अन्याय अत्त्याचार विरोधात लवकरच व्यापक आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.