# ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी उरुळी देवाची ग्रामस्थांसह महिलांचे आंदोलन.

 

पुणे: ए ग्रेड महापालिका असूनही दुष्काळी भागासारखी परिस्थिती उरुळी देवाची या गावातील लोकांची झाली आहे. पत्र लिहिली, निवेदने दिली तरीही महापालिका अजूनही जागी होईना आणि उरुळीकरांची दैना संपेना. यासाठी ग्रामस्थांनी आज एकत्र येत काळी फित लावून पुणे महापालिकेचा निषेध केला. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने आपअापल्या घरासमोर आणि चौका चौकात एकत्र येऊन डोक्यावर हंडा घेऊन निषेध व्यक्त केला.

लाखो रुपये खर्च करून पुणे महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावाला बंद पाइपलाइनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे काम पूर्ण होऊनही पाणी सुरू होत नाही. मंतरवाडीत पाणी येते परंतु उरुळीत पाणी नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी टँकरला होणारी गर्दी टाळून पाइपलाइनने पाणी सुरू करावे, अशी मागणी पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे भारिपचे शहराध्यक्ष व उरुळीचे माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी करूनही कोणत्याही प्रकारची दखल आजपर्यंत घेतली नाही. त्यामुळे आजचे आंदोलन करण्यात आले. कोरोनामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून अजून टँकर भोवती गर्दी जास्तच वाढत आहे याची दखल घेणे गरजेचे आहे.

ऊरूळी देवाची गावासाठी यापूर्वीच पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला आहे. शिवाय 10 दशलक्ष लिटरची पाण्याची टाकीही कचरा डेपोजवळ बांधून अनेक दिवसांपासून तयार आहे. कचराडेपो परिसरात नलीकेद्वारे पाणीपुरवठा केला जातो त्याप्रमाणे ऊरूळी देवाची गावास का केला जाऊ शकत नाही. सध्याची परिस्थिती कोरोनामुळे गंभीर आहे. पुण्यातील वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेऊन जिथे जिथे गर्दी टाळता येईल तिथे गर्दी टाळू शकतो व कोरोनाला थांबवू शकतो. त्याप्रमाणे उरुळी देवाची येथील टँकर बंद करून परिसरातील नागरिकांना गर्दीपासून रोखणे शक्य आहे. तरीही महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अतुल बहुले यावेळी यांनी केला.

टँकरवर पाणी भरणे धोक्याचे आहे, शिवाय सध्या पावसाळी दिवस असल्यामुळे अजूनही लोकांना त्रास होऊ शकतो. यामुळे नागरिकांना कोरोनाची लागण होऊ शकते. त्यासाठी महापालिकेला जबाबदार धरले जाईल. आठ दिवसात बंद नलीकेद्वारे पाणी गावाला सुरु करण्यात यावे अन्यथा उरुळी देवाची गावातील ग्रामस्थांनी आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व उरुळी देवाची गावाचे माजी उपसरपंच व भारिपचे शहराध्यक्ष अतुल बहुले यांनी केले. यावेळी माजी सरपंच आप्पासाहेब नेवसे, जय हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रतीक तांगडे, अक्षय नेवसे, पद्मावती ताई सिंगाडे, नीलमताई सोनमळे, भारतीताई धर्माधिकारी, रुपालीताई तांगडे, जयाताई नेवसे, अल्काताई बहुले, जाईबाई बहुले, पोर्णिमाताई बहुले, बोलेनाथ भाडळे, संदीप ढेरंगे, दिलीप मोरे, अनिल आदमाने, मिथुन शिळीमकर, आबा अडसूळ, प्रतीक बहुले यांच्यासह उरुळी देवाची येथील महिला व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *