पालघर आरोग्य पथकातील अधिपरिचारिका स्मिता इंगळे यांचा समावेश
पालघर: दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. महिला दिनाचे औचित्य साधून शिलेदार ऍडव्हेंचर इंडिया संस्थेच्या वतीने खास महिलांसाठी रायगड वरील हिरकणी कडा सर करण्याच्या मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेत सातारा पोलीस दलातील मोनाली निकम, सोलापूर वनविभागातील शिलाताई बडे, पालघर आरोग्य पथकातील अधिपरिचारिका स्मिता इंगळे यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणा-या महिला व पुरुष असे 50 जण सहभागी झाल्या होते.
“जिथून फक्त पाणी खाली जाऊ शकते आणि वारा वर येऊ शकतो”, असं वर्णन रायगडावरील हिरणीकड्याचं करण्यात आलं आहे. रायगडावर दूध दही विकण्यासाठी आलेली हिरकणी सुर्यास्तानतंर रायगडचे दरवाजे बंद झाल्यामुळे, आपले बाळ घरी एकटे असेल, भुकेले असेल या विचाराने व्याकूळ होऊन रायगडचा अवघड असा कडा ऊतरुन गडाखाली येते. ही गोष्ट जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजते तेव्हा राजे त्या हिरा गवळणीला गडावर बोलवून सन्मान करतात व तो कडा तासून तिथे बुरुज बांधून त्याला हिरकणी बुरुज हे नाव देतात. इतिहासात घडलेली ती हिरा गवळणीची गोष्ट आजही कित्येक महिलांना प्रेरणादायी आहे.
महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रविवार, 7 मार्च रोजी शिलेदार ऍडव्हेंचर इंडिया संस्थेच्या वतीने खास महिलांसाठी रायगड वरिल रौद्रभिषण हिरकणी कडा आरोहण मोहिमेचे आयोजन केले होते. रायगड हिरकणी कडा सर करुन सहभागी महिलांचा सन्मान करत महिलांप्रती आदर व्यक्त करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. मोहिमेत काही महिला सदस्या पारंपरिक पोशाख परिधान करुन सहभागी झाल्या होत्या.
मोहिमेत सातारा पोलीस दलातील मोनाली निकम, सोलापूर वनविभागातील शिलाताई बडे, पालघर आरोग्य पथकातील अधिपरिचारिका स्मिता इंगळे यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणा-या महिला सहभागी झाल्या होत्या, आदिती व आर्या या लहान मुलीही मोहिमेत सहभागी होत्या. तसेच सोलापूर पोलीस दलातील पोलीस अधिकारी नितीन पवार, डहाणू येथील डाॅ. नितीन इंगळे, रोहित जाधव यांच्यासह 50 महिला पुरुष सदस्य या मोहिमेत सहभागी होते. जन्मापासून एका पायाने दिव्यागं असणारे जनार्दन पानमंद याचा मोहिमेतील सहभाग सर्वांचा ऊत्साह वाढविणारा होता.
या मोहिमेचे नेतृत्व शिलेदार संस्थेच्या महिला सदस्या कविता बोटाले, शितल जाधव, अमिता सलियान व सिद्धी कदम यांनी केले तर शिलेदार संस्थेचे प्रमुख शिलेदार सागर विजय नलवडे, विनायक, प्रदीप, सोपान, शैलेश, रजनीकांत, प्रितम यांचे सहकार्य लाभले.