जालना: कोरोना संसर्गामुळे संपूर्ण मानवी जीवन विस्कळीत झाले असून सुख – दु:खांचे क्षण, निसर्गातील सौंदर्य हेरून मानवाचे सोबती असलेला छायाचित्रण व्यवसाय अडचणीत सापडला आहे. तरी सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईल. हे दिवस ही निघून जातील. खचून न जाता छायाचित्रकारांनी व्यवसाय करावा, असा आशावाद माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी आज येथे छायाचित्रकारांना दिला.
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त बुधवार, १९ ऑगस्ट रोजी जालना जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन तर्फे भाग्यनगर येथील माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या दर्शना निवासस्थानी छोटेखानी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती रामेश्वरराव भांदरगे पाटील, फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल व्यवहारे, ज्येष्ठ छायाचित्रकार नरसिंग सरगम, माजी अध्यक्ष राजेश खर्डेकर, शासकीय छायाचित्रकार अनिल परदेशी, नागेश बेनीवाल, सोनाजी नन्नवरे, अमित काळे, लक्ष्मीकांत नारळे, गौतम वाघमारे, नीलेश बोरसे, ऋषिकेश शिंदे यांची उपस्थिती होती.
फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल व्यवहारे यांनी कोरोना संसर्गजन्य काळात जोखीम पत्करून छायाचित्र व्यवसाय करत असले तरीही शारीरिक अंतर ठेवून सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेत छायाचित्रकारांनी व्यवसाय करावा. असे आवाहन केले. रामेश्वरराव भांदरगे यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. प्रारंभी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन आशीष रसाळ यांनी केले तर नागेश बेनीवाल यांनी आभार मानले.
आर्ट गॅलरीच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार: जालना शहरात छायाचित्रकारांसाठी आर्ट गॅलरी उभारण्यात यावी ही अनेक वर्षांपासून मागणी असून राज्य शासनाने या कामी मदत करावी, अशी मागणी फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल व्यवहारे यांनी केली. दरम्यान, नगर परिषदेकडून जागा मिळाविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून आर्ट गॅलरीसाठी अनुदान मिळवून दिले जाईल, अशी ग्वाही माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिली.