अंबाजोगाई: जगात तिसरे महायुद्ध अमुक या कारणाने होणार अशा चर्चा सतत घडत असतात. मात्र, जगात तिसरे महायुद्ध हे अन्य कोणत्याही कारणाने होणार नसून ते केवळ विषाणू आणि मानव यांच्यातच गेली दीड पावणे दोन वर्षापासून होत आहे आणि ते आजही चालूच असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यीक, विचारवंत तथा मुक्त पत्रकार अमर हबीब यांनी व्यक्त केली. ते अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित आयोजित कोरोना योद्धे यांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी चंदन कुलकर्णी, महावितरण चे उप कार्यकारी अभियंता संजय देशपांडे, पुणे येथील उद्योजक तथा बिल्डर रसिक कुंकुलोळ, बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महादेव धांडे, बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी, कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्ष ऍड विष्णूपंत सोळंके, नगरसेवक मनोज लखेरा, बँकेचे संचालक प्रा. वसंत चव्हाण, पुरुषोत्तम चोकडा, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जड उपस्थित होते.
अंबाजोगाई पिपल्स बँकेला 25 वर्षे पूर्ण होत असल्याने बँक यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे येथील विलासराव देशमुख सभागृहात शिक्षक आणि महावितरण चे अधिकारी आणि कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले. प्रास्ताविकामध्ये मोदी यांनी बँकेच्या कार्याची माहिती दिली. तसेच कोरोना महामारीच्या काळात आलेली संकट आणि त्यावर मात करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली अशा कोरोना योद्धे यांच्या बाबतीत संवेदना व्यक्त केली. या काळात शिक्षक आणि महावितरण चे अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळातील लॉकडाऊन मध्ये सर्व नागरिक आपापल्या घरी होते. मात्र, शिक्षक आणि महावितरण चे कर्मचारी हे आपल्या जीवाची आणि कुटुंबातील सदस्य यांची पर्वा न करता शहरातील नागरिक यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करीत होते. याबाबत या कर्मचारी वर्गाचे अभिनंदन कौतुक केले.
या कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी चंदन कुलकर्णी, महावितरण चे उप कार्यकारी अभियंता संजय देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे विजय रापतवार यांनी केले.