डॉ.सोमनाथ रोडे, सचिन परब, अजीम राही, नारायण पुरी, उद्धव कानडे यांच्यासह अंकिता जोशी व कृष्णा बोंगाणेंच्या स्वरांनी मैफल रंगणार
अंबाजोगाईः यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणार्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे यावर्षी ३६ वे वर्ष असून दोन दिवसीय कार्यक्रमात उद्घाटन समारंभ, कवी संमेलन, शास्त्रीय संगीत कार्यक्रमात ‘जसरंगी जुगलबंदी’, पुरस्कार वितरण, समारोप समारंभ होणार आहे.
अंबाजोगाईत गेल्या ३५ वर्षांपासून सातत्याने यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने वैविध्यपूर्ण, वैचारिक, वाङ्मयीन, सांगितीक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार, कृषिविषयक प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन तसेच ग्रंथ प्रदर्शन असे विविध कार्यकम आयोजित केले जातात. अंबाजोगाई व मराठवाड्याचा सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, वैचारिक वारसा जोपासण्याचा व दृढ करण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी ३६ वा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह २५ व २६ नोव्हेंबर बुधवार व गुरुवार रोजी होणार आहे, अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली.
उद्घाटन व कवी संमेलन: बुधवार, २५ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वा. या समारोहाचे उद्घाटन मुंबई येथील मुक्त पत्रकार व रिंगणचे संपादक सचिन परब यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
रात्रौ ८.३० वा. कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी पुणे येथील येथील ज्येष्ठ कवी उद्धव कानडे हे राहणार असून, कवी संमेलनाचे सूत्रसंचालन साखरखेर्डा (जि.बुलढाणा) येथील सुप्रसिद्ध कवी अजीम नवाज राही करणार आहेत. तर सुप्रसिध्द कवी पुरुषोत्तम सदाफुले पुणे, नारायण पुरी तुळजापूर, आनंद पेंढारकर डोंबिवली, विनायक पवार पेण, डॉ. सुजाता जोशी पाटोदेकर नांदेड व शंकर राठोड, नायगाव (जि.नांदेड) यांचा सहभाग राहणार आहे.
गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सायं. ५.३० वा. समारोप समारंभ होणार आहे. लातूर येथील बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व अ.भा. सर्वोदय मंडळाचे विश्वस्त प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ होणार आहे. या समारंभात मराठवाड्यातील कृषी, साहित्य, संगीत व युवा (युवा व्याख्याता) या क्षेत्रातील चार गुणवंतांचा यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सन्मान करण्यात येणार असून, त्यात डोंगरकडा कळमनुरी येथील शेती उद्योजक व शेतकर्यांचे प्रेरक चंद्रशेखर कुलकर्णी याना कृषी, जालना येथील ज्येष्ठ लेखिका रेखा बैजल यांना साहित्य, अंबाजोगाईच्या सौ.सरोजिनी देशपांडे उर्फ राणी वडगावकर यांना संगीत, तर दोन्ही हात नसलेला परंतु जिद्दीने दोन पायाच्या मदतीने आश्चर्यकारक जीवन जगणारा व युवकांचे प्रेरणा असणारा पूर्णा येथील युवक योगेश खंदारे याला युवागौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह, रोख पाच हजार रूपये, शाल, पुष्पगुच्छ असे आहे.
शास्त्रीय संगीतसभेत’जसरंगी जुगलबंदी’: रात्री ७.३० वा. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत नुकतेच दिवंगत झालेले पं. जसराज यांना संगीतमय श्रद्धांजली दिली जाईल. अंकिता जोशी, नांदेड व कृष्णा बोंगाणे हे ‘जसरंगी जुगलबंदी’ हा संगीतमय कार्यक्रम सादर करतील. त्यांना तबल्यावर आशय कुलकर्णी व सागर पटोकार तर संवादिनीवर अभिनय रवंदे व अभिषेक शिनकर हे साथ करतील. अंकिता जोशी या पं.जसराज यांच्या शिष्या आहेत तर कृष्णा बोंगाणे हे पं.नाथराव नेरळकर यांचे शिष्य आहेत. त्यापूर्वी पुरस्कार प्राप्त सौ.सरोजनी देशपांडे वडगावकर यांचे गायन होईल. त्यांना संवादिनीवर पांडुरंग देशपांडे व तबल्यावर प्रकाश बोरगावकर हे साथ करतील. या वर्षी हा समारोह कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करून मोजक्या श्रोत्यांच्या उपस्थित होणार आहे. दोन्ही दिवस या कार्यक्रमाचे फेसबुकवर व अंबाजोगाई एसीएन चॅनलवर थेट प्रक्षेपण होईल. फेसबुक वर यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह अंबाजोगाई, या पेजवरून लाईव्ह होईल. महिला महाविद्यालयाच्या भगवानरावजी लोमटे व्यासपीठ येथे हा कार्यक्रम होईल.
कै.भगवानरावजी लोमटे यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या या समारोहाचे महाराष्ट्रभर कौतुक झालेले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचलेल्या या समारोहास रसिक श्रोत्यांनी तिन्ही दिवस उपस्थित राहून सहकार्य करावे व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य कमलाकर कांबळे, सहसचिव प्रा.सुधीर वैद्य, कोषाध्यक्ष सतीश लोमटे, सदस्य प्राचार्य प्रकाश प्रयाग, प्रा.भगवान शिंदे यांच्यासह सल्लागार भगवानराव शिंदे बप्पा व राजपाल लोमटे यांनी केले आहे.