पुणे: राज्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला अतिमुसळधार पावसाने कोकण विदर्भात विश्रांती घेतली आहे. मात्र, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात वाढत असून, 17 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वा-यासह तुफान पाऊस बरसणार आहे. हवामान विभागाने या भागातील सर्वच जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
मध्यपूर्व अरबी समुद्र ते उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी पर्यंत कमी दाबाचा पट्टा पाच दिवसांपासून कायम आहे. पुढील चोवीस तासात दक्षिण गुजरातकडे सरकणार असून, त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. तसेच 19 ऑक्टोबरला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्यानंतरच्या 24 तासात त्याची तीव्रता वाढणार आहे. याचा परिणाम म्हणून मध्यमहाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुफान पाऊस बरसेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
शनिवारपासून चार दिवस ‘यलो अलर्ट’ असलेले जिल्हे:
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर, नाशिक, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर,उस्मानाबाद.
गेल्या चोवीस तासात राज्यात पडलेला पाऊस (मिमीमध्ये)
कोकण:- लांजा-120, राजापूर, वैभववाडी-110, रत्नागिरी-90, पेडणे, संगमनेश्वर, देवरूख-80, मालवण-70, सांवतवाडी-60, अलिबाग, कणकवली, म्हापसा, वेंगुर्ला-50
मध्यमहाराष्ट्र:- गगनबाबडा-120, पन्हाळा-70, चांदगड, वेल्हे-40
मराठवाडा:- हिंगोली 10,
विदर्भ :- सिल्लोड-10, गोंडपिपरी-30, चामुरशी-10.