पुणे: राज्यातून अजून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यापूर्वीच गेल्या अठवड्यापासून राज्याच्या सर्वच भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. आता हाच पाऊस 15 ऑक्टोबर पर्यंत सुरूच राहणार आहे. दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील सर्वच भागात ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे.
मध्यपूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. पुढील बारा तासात (दि.13) हा पट्टा उत्तर आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम आणि नरसापूर पासून 360 किमी अंतरावर समुद्रात असून त्याचे रूपांतर अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. त्यामुळे राज्यात 15 ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडणार आहे.
दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस 15 ऑक्टोबर पर्यंत सुरूच राहणार आहे.